काबूलमध्ये हल्ल्यात एका भारतीयासह नऊ ठार

काबूल- येथील एका हॉटेलवर तालिबानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एका भारतीय नागरिकासह नऊ जण ठार झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी आज (शुक्रवार) दिली. झिन्हुआ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, तालिबानी दहशतवाद्यांनी सेरेना या हॉटेलवर हल्ला केला. या हल्लामध्ये कॅनडाच्या दोन महिला, न्यूझीलंडचे दोघे जण, भारत व पाकिस्तानमधील प्रत्येकी एकजण व अन्य चार परदेशी नागरिकांसह एकूण दहाजण ठार झाले आहेत.  

तालिबानी दहशतवाद्यांनी गुरुवारी (ता. 20) रात्री नऊच्या सुमारास सेरेना हॉटेलमध्ये प्रवेश करून जोरदार गोळीबार केला. या गोळीबारात दहाजण जागीच ठार झाले तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. चकमकीमध्ये चार दहशतवादीही ठार झाले आहेत. तालिबानी दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे, अशी माहिती सुरक्षा दलाने दिली.