मुंबई – नरेंद्र मोदी आमचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात आम्ही वाराणासीमध्ये उमेदवार उभा करणार नाही. वाराणासी, लखनऊमध्ये आम्ही भाजप विरोधात निवडणूक लढवणार ही निव्वळ अफवा आहे असे शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी टि्वटरवरुन स्पष्ट केले.
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना शिवसेना वाराणासी, लखनऊसह उत्तरप्रदेशात वीस जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. बिहार, दिल्लीमध्ये प्रत्येकी पाच आणि पंजाबमध्ये दोन जागांवर शिवसेना उमेदवार उभे करणार असल्याची त्यांनी माहिती दिली होती. त्यामुळे उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या होत्या.
आदित्य ठाकरेंनी टि्वटरवरुन शिवसेना वाराणासी-लखनऊमध्ये निवडणूक लढवणार नसल्याचा खुलासा केला आहे. मात्र उत्तरप्रदेश आणि बिहारमधील अन्य जागांबद्दल त्यांनी काहीही स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे शिवसेना या जागा लढवणार ? हा अजूनही प्रश्नच आहे. उत्तरप्रदेश आणि बिहारमधुन भाजपला यंदा मोठया अपेक्षा आहेत. त्यामुळे शिवसेनेने येथे उमेदवार उभे केले तर, महायुतीत मोठी बिघाडी निर्माण होईल.