बगदादमध्ये आत्मघाती हल्ल्यात 46 ठार

बगदाद- एका कॅफेमध्ये झालेल्या आत्मघाती हल्ल्यामध्ये 46 जण ठार झाले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी आज (गुरुवार) दिली. बुधवारी (ता. 19) रात्री उशिरा हा आत्मघाती हल्ला झाला आहे.  पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री एका कॅफेमध्ये टीव्हीवर फुटबॉलचे सामने पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी एकाने आत्मघाती स्फोट घडवून आणला. या स्फोटात 46 जणांचा जागीच मृत्यू झाला तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. 

जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्‍यता आहे.  इराकमध्ये शिया व सुन्नी या दोन गटांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद सुरू आहेत. या वादामधूनच ही घटना घडली असल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. मंगळवारी (ता. 18) झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 15 जणांचा मृत्यू झाला होता. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये सुन्नी नागरिकांवर झालेल्या हल्ल्यात 47 जणांचा मृत्यू झाला होता. इराकमध्ये गेल्या वर्षी विविध हल्ल्यांमध्ये आठ हजार 868 नागरिक ठार झाले आहेत.