६० टक्के कर्मचार्‍यांना नोकरी बदलण्याची इच्छा

रिक्रूट एक्स या संस्थेने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात भारतातील किमान ६० टक्के कर्मचार्‍यांना येत्या सहा महिन्यात नोकरी बदलण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा आहे. ५८ टक्के कर्मचार्‍यांना नवीन नोकरीत बढतीच्या जागी जाता यावे अशी इच्छा असल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे.या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार आजच्या कर्मचार्‍यांना जादा पैसा मिळविण्यापेक्षा वरीष्ठ पद मिळविणे, नेतृत्वाची पोझिशन कायम राहणे हे अधिक महत्त्वाचे वाटते आहे. 

चांगले आणि मनासारखे तसेच करियरमध्ये प्रगती करण्याची संधी असेल तर थोड्या कमी पगारावरही काम करण्यास आजचा कर्मचारी तयार आहे असे यात आढळून आले आहे. संस्थेने हे सर्वेक्षण विविध क्षेत्रात केले आहे तेव्हा ४० टक्के कर्मचारी त्यांच्या सध्याच्या नोकरीत संतुष्ट नाहीत असे आढळले तर २० टक्के लोक आहे त्या नोकरीत समाधानी असल्याचे आढळले.