औरंगाबाद – अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे उद्ध्वस्त झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांचे आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. मराठवाड्यात सहा, विदर्भात दोन, तर जळगावात एक अशा नऊ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे मंगळवारी समोर आले आहे. औरंगाबाद, उस्मानाबाद या जिल्ह्यांत प्रत्येकी दोन शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली, तर नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत आणि जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात प्रत्येकी एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी समोर आला.
मराठवाड्यात गेल्या दीड आठवड्यात ११ शेतकऱ्यांनी, तर जळगावात चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. पैठण तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी धुलिवंदनाच्या दिवशी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. नांदर गावातील शेतकरी डिगंबर गंगाधर राऊत (वय ६०) या शेतकऱ्याने शेतात विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. विहामांडवा गावातील लक्ष्मण एकनाथ फुले (६०) या शेतकऱ्यानेही शेतात विषारी औषध पिऊन आपले जीवन संपवले. नांदेड जिल्ह्यातील कोहळी (ता. हदगाव) येथील शेतकरी यादव चंपती पतंगे (६०) यांनी शेतातील गोठ्यामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.
हिंगोलीतील कळमनुरी तालुक्यातील हिवरा गावातील भीमराव सोपान गोडबोले (४०) यांनी सोमवारी रात्री स्वतःच्या घरात पेटवून घेतले. गारपिटीमुळे झालेले नुकसान आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून उस्मानाबाद तालुक्यातील आळणी येथील शेतकरी अनिल कुलकर्णी (५४) यांनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली, तर कळंब येथील राजाभाऊ हरिश्चंद्र लोमटे यांचे मंगळवारी लातूर येथे उपचारादरम्यान निधन झाले. शेतीच्या नुकसानीनंतर त्यांनी स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. सततची नापिकी, कर्जाचा वाढता डोंगर आणि गारपिटीने शेतीचे झालेले मोठे नुकसान यामुळे गेल्या दोन दिवसांत विदर्भातील चंद्रपूर व नागपूर जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. चंद्रपूर जिल्ह्यातील बोरगाव येथील अभिमान कानूजी काळे (५५) यांनी सोमवारी सायंकाळी गळफास लावून जीवनयात्रा संपविली.
काळे यांची बोरगाव येथे तीन एकर शेती होती. त्यांनी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ५५ हजाराचे कर्ज घेतले होते. दुसऱ्या घटनेत नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील बोरगाव येथील युवा शेतकरी विजय श्रावण धोटे (२६) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्याकडे १२ एकर शेती आहे.