क्रिमिया एक स्वतंत्र देश

किव्ह – अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांनी लादलेल्या कठोर निर्बंधाकडे दुर्लक्ष करत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी क्रिमियाला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली आहे. रशियाने हे पाऊल उचलून थेट अमेरिकेला आव्हान दिले आहे. त्यामुळे शीत युध्दानंतर पुन्हा एकदा या दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. अमेरिका आणि युरोपियन युनियनने रशियाची कोंडी करण्यासाठी रशियावर अनेक कठोर आर्थिक निर्बंध लादले आहेत. क्रिमियन जनतेची मत जाणून घेण्यासाठी रविवारी झालेल्या मतदानात ९७ टक्के लोकांनी रशियामध्ये विलीन होण्याची इच्छा व्यक्त केली. 

क्रिमिया हा युक्रेनचा भाग असून, क्रिमियाला काही विशेषाधिकार आहेत मात्र तेथे कायदे युक्रेनचे चालतात. क्रिमियाला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देण्याला अमेरिका आणि ब्रिटनने विरोध केला आहे. रशियाने युक्रेनमध्ये हस्तक्षेप करु नये, यासाठी रशियावर सर्वबाजूंनी दबाव आणला जात आहे. मात्र रशिया माघार घ्यायला तयार नाही. अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांनी ही सार्वमत चाचणी अवैध ठरवली आहे. रशियन फौजांनी गेल्या महिन्यातच रणनितीक दुष्टया महत्वाच्या असलेल्या काळया समुद्रावर नियंत्रण मिळवले असून, क्रिमियामध्ये फौजा उतरवल्या आहेत. क्रिमियाला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देणे हे क्रिमियाचे रशियामध्ये विलीनीकरण करण्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे.