पॅरिस – स्विडन थिंक टँकच्या एका अहवालानुसार शस्त्र खरेदीमध्ये भारत जगातील अव्वल क्रमांकाचा देश ठरला आहे. एवढेच नाही तर, अंदाधुंद खरेदीमध्ये भारताने शेजारी चीन आणि पाकिस्तानलाही मागे टाकले आहे. दोन्ही शेजारी देशांच्या तुलनेत भारताने तीनपट अधिक वेगाने शस्त्रास्त्रांची आयात केली आहे.
स्टॉकहोम इंटरनॅशन पीस रिसर्च इन्स्टिट्यूटनुसार 2009 ते 2013 या पाच वर्षांमध्ये भारताने शस्त्रास्त्र खरेदीमध्ये 14 टक्के वाढ केली आहे. 2010 मध्ये भारताने वेगाने शस्त्र आयातीमध्ये चीनलाही मागे टाकले आहे. भारतातील अंतर्गत संरक्षण उद्योगात उत्पादनात कमतरता आली आहे, तर चीनच्या आधुनिक शस्त्रास्त्र आणि संरक्षणासंबंधीच्या कारणामुळे भारताला नवीन आणि आधुनिक शस्त्रांची गरज भासत आहे. 2009-2013 या पाच वर्षांमध्ये भारताने रशियाकडून 75 टक्के शस्त्रास्त्रांची खरेदी केली आहे. त्यासोबतच भारतीय शस्त्रांना अत्याधूनिक करण्यास देखील मदत केली आहे. गेल्या वर्षी अमेरिकेनेही भारताला शस्त्रांची विक्री केली होती.
आयएचएसच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी भारत अमेरिकेचा सर्वात मोठा खरेदीदार होता. भारताने अमेरिकीन शस्त्रास्त्रांच्या खरेदीसाठी 1.9 बिलियन डॉलरची गुंतवणूक केली. यातील सर्वाधिक रक्कम ही बोइंग सी-17ए ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आणि पी-81 मेरीटाइम पेट्रोल एअरक्राफ्टसाठी वापरण्यात आली. 2009 -13 या वर्षांमध्ये मात्र अमेरिकेने केवळ सात टक्केच शस्त्रास्त्रांची विक्री भारताला केली होती.