अमेरिकेत महिलेपासून महिलेला एड्स

वॉशिंग्टन- महिला जोडीदाराकडून एका ४६ वर्षीय अमेरिकन महिलेला ‘एचआयव्ही‘ विषाणूंचा संसर्ग झाला असल्याची घटना समोर आली आहे. महिलेपासून महिलेला लैंगिक संबंधांतून ‘एचआयव्ही‘सारख्या तत्सम विषाणूची बाधा होण्याची ही अत्यंत दुर्मिळ घटना आहे.  यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी) या संस्थेने गुरुवारी सांगितले की, प्रयोगशाळेतील चाचणीमध्ये असे आढळून आले आहे. टेक्सासमधील एका महिलेला ‘एचआयव्ही‘चा संसर्ग झाल्याचे यापूर्वीच दिसून आले होते. मात्र, तिच्या जोडीदार महिलेच्या शरिरातही तसाच विषाणू आढळून आला. 

 नव्याने संसर्ग झालेल्या त्या दुसऱ्या महिलेला इंजेक्शन, औषधे, टॅटू, ऍक्युपंक्चर किंवा शरिरावर टोचल्याने (पिअर्सिंग) ‘एचआयव्ही‘ची बाधा होण्याची जोखिमीची शक्यता अद्याप दिसून आलेली नाही.  त्यामुळे तिला ‘एचआयव्ही‘ची बाधा होण्याचा स्त्रोत हा तिची लैंगिक संबंध असणारी जोडीदार महिला असावी, असे ‘सीडीसी‘ने म्हटले आहे.