मुंबई- मुंबईत आल्यानंतर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे येथील जनता नाराज झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर सर्वस्तरातून टीका होत आहे. केजरीवालांनी आधी स्वताच्या हुल्लडबाज कार्यकर्त्यांना शिस्तीचे धडे द्यावेत असे सांगत दिल्लीतला तमाशा मुंबईत नको, अन्यथा त्यांना मुंबईकरांच्या क्रोधाला सामोरे जावे लागेल असा इशारा उद्धव ठाकरेंनी अरविंद केजरीवालांना दिला आहे.
शिवसेनेच्या ‘सामना’ या मुखपत्रातून केजरीवालांवर तोफ डागत उद्धव यांनी त्यांची नाटकवाला अशी हेटाळणीही केली. इतर राजकीय पक्षांमुळे जेव्हा सामान्य जनतेला त्रास होतो, तेव्हा अशा राजकीय पक्षांना कच-याच्या डब्यात फेका’ असे ‘आप’चे नेते सांगतात. मग मुंबईत येईल तो सिग्नल तोडून पुढे जाणा-या, लोकलमध्ये घुसून,मेटल डिटेक्टर तोडून जनतेला त्रास देण्याचा गुन्हा करणा-या केजरीवालना या गुन्ह्याबद्दल वरळीच्या गटारात फेकायचे का असा प्रश्नही विचारण्यात आला आहे.
आागामी काळात होत असलेल्या लोकसभेच्या निवडणूका लढविण्याचा केजरीवाल यांच्या पक्षास हक्क जरूर आहे, पण त्यासाठी अशाप्रकारे ढोंगबाजी करण्याची गरज नाही असे सांगत दिल्लीत त्यांनी जी ढोंगबाजी केली, जो साधेपणाचा मुखवटा चढवला, जे वादे-वायदे केले ते सर्व गळून पडले असल्याची टीकाही लेखात करण्यात आली आहे. त्यामुळे आता केजरीवाल यांच्यावर करण्यात आलेल्या या आरोपांना ते काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.