विमान शोधण्यासाठी उपग्रहाने काढली सहा लाख छायाचित्रे

कोलॅरेडो – अमेरिकेतील कोलॅरेडो येथील कंपनीने त्यांच्या उपग्रहाद्वारे दक्षिण चीनच्या समुद्रातील सहा लाख छायाचित्रे काढली आहेत.   मलेशियन एअरलाइन्सचे बेपत्ता विमान शोधण्यासाठी बहुराष्ट्रीय शोधमोहीम मोठ्या प्रमाणावर राबवली जात आहे. चार दिवस अहोरात्र शोध घेऊन या विमानाची कोणतीच माहिती मिळालेली नाही. अमेरिकेतील कोलॅरेडो येथील कंपनीने त्यांच्या उपग्रहाद्वारे दक्षिण चीनच्या समुद्रातील सहा लाख छायाचित्रे काढली आहेत. या छायाचित्रांचा वापर शोधकार्यासाठी केला जात आहे. 

‘डिजिटल ग्लोब’ या कंपनीने मंगळवारपासून त्यांच्या www.tomnod.com च्या संकेतस्थळावर दक्षिण चीन समुद्रातील छायाचित्रे टाकण्यास प्रारंभ केला. नागरिकांना विमानाचे अवशेष, तेलाचा तवंग किंवा अन्य पुरावे सापडल्यास त्यांनी ते छायाचित्र मोठे करावे, असे आवाहन कंपनीचे वरिष्ठ संचालक शाय-हार-नॉय यांनी केले आहे. या संकेतस्थळावर छायाचित्रे पाहण्यासाठी इच्छुकांची एकच गर्दी उडाली आहे. या संकेतस्थळावरील १० दशलक्ष पाने पाहिली आहेत. त्यामुळे कंपनीचा सव्‍‌र्हर जाम झाला आहे. अमेरिकी सरकारही ही छायाचित्रे पाहत आहे, असे नॉय यांनी सांगितले.