गारपिटीमुळे झाली अतोनात हानी

मुंबई- गारपिटीच्या अस्मानी संकटाने झालेल्या नुकसानीच्या सरकारी पाहणीची पहिली फेरी पूर्ण झाली असून त्यातील माहितीनुसार २८ जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती पुढे आली आहे. या संकटात १०६ जण गंभीर जखमी झाले असून १ हजार ६२१ जनावरांचा मृत्यू झाला आहे. १३ लाख ७० हजार ३२६ हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून यातील सर्वाधिक फटका मराठवाडा विभागाला बसला आहे. २८ मृतांपैकी एकटय़ा मराठवाड्यात १५ जण दगावले असून, त्यातही पाच जण एकटय़ा बीड जिल्ह्यातील आहेत. 

प्रशासनाने केलेल्या पाहणीचा अहवाल तयार करण्यात आला असून त्याच्या आधारे शेतक-यांना मदतीचे वाटप करण्यात येणार आहे. गारपिटीच्या तडाख्याचा फटका राज्यातील २८ तालुक्यांना बसला असून या जीवघेण्या संकटाने शेतकरी पूर्णपणे कोलमडून गेला आहे. शेतीचे तर नुकसान झाले आहेच, परंतु पोटच्या पोराप्रमाणे जपलेली लाखमोलाची जनावरे या गारपिटीच्या थैमानात ठार झाली. ठार झालेल्या १ हजार ६२१ जनावरांपैकी १ हजार ३६० शेळ्या-मेंढय़ासारखी छोटी जनावरे आहेत. तर २६१ मोठी म्हणजे बैल, गाय, म्हैस ही जनावरे आहेत. त्याशिवाय ७ हजार ५५९ कोंबड्याही ठार झाल्या आहेत. नुकसान झालेल्या १३ लाख ७० हजार ३२६ हेक्टर शेतीपैकी १२ लाख ७१ हजार ८५३ हेक्टर पिकांची शेती आहे, तर ९८ हजार ४७३ हेक्टर फळबागा आहेत. 

गारपिटीचा सर्वाधिक तडाखा मराठवाड्याला बसला असून १५ माणसे, ४२१ जनावरांचा मृत्यू झाला असून २ हजार ६८३ घरांचे नुकसान झाले आहे. त्याशिवाय ५ लाख ९० हजार ३२० हेक्टर शेतीचे नुकसान झाले. त्या खालोखाल विदर्भाला फटका बसला असून नागपूर विभागात ६ माणसे, १५३ जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर १ हजार २६१ घरांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने केलेल्या पाहणीचा अहवाल सरकारला सादर केला असून त्यानुसार प्राथमिक मदत शेतक-यांना मिळणार आहे. त्याशिवाय केंद्रीय पथकही महाराष्ट्राचा दौरा करणार असून त्या आधारे केंद्राचीही मदत महाराष्ट्राला मिळू शकते. त्यासाठी राज्य सरकारकडून पाठपुरावा होण्याची आवश्यकता आहे. 

गेल्या आठवड्यापासून राज्यात सुरू असलेली गारपीट अजून दोन दिवस कायम राहणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये काही प्रमाणात गारपीट होईल, असे पुणे प्रादेशिक हवामान खात्याच्या संचालिका सुमित्रादेवी यांनी सांगितले. गारपिटीनंतर तीव्र उन्हाळ्याच्या झळा सुरू होण्याचा इशारा त्यांनी दिला. सध्या थंडीने आपला गाशा गुंडाळला असून काही दिवसांतच उन्हाळा दाखल होईल. सध्या राज्यातील कमाल तापमान हे ३० अंशावर आहे. मात्र उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तापमानात सहा अंशाने वाढ होण्याची शक्यता सुमित्रादेवी यांनी दिली. मात्र मुंबई ही समुद्राजवळ असल्याने गारपिटीचा धोका शहराला नाही.