विधान परिषदेच्या जागांसाठी युतीमध्ये चुरस

मुंबई – विधान परिषदेच्या ९ जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत १० अर्ज दाखल झाले. त्यामुळे आता आगामी काळात मताची जुळवाजुळव सर्वांना करावी लागणार आहे. मताची जुळवा-जुळव करण्यात सर्वचजण व्यस्त आहेत. एक जागा कोणाची तरी जाणार असल्याने सर्वचजण आपले उमेदवार निवडून यावेत यासाठी तयारी करीत आहेत. भाजप व सेनेकडे कमी मतदार असल्याने त्यांच्यात चूरस निर्माण झाली आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याआचा सोमवारी शेवटच्या दिवशी काँग्रेसच्या तीन तर भाजपच्या दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३ आणि शिवसेनेच्या दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.त्यामुळे या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा विजय सहज आहे. मात्र शिवसेना-भाजप युतीचे तीन उमेदवार विजयी होण्याची शक्यता असताना चार अर्ज दाखल झाल्याने ९व्या जागेसाठी शिवसेना भाजप आमने-सामने आहेत.

काँग्रेसचे शिवाजीराव देशमुख, हरीभाऊ राठोड आणि चंद्रकांत रघुवंशी यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. या वेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे उपस्थित होते. भाजपकडून विनोद तावडे अणि पांडुरंग फुंडकर यांनीही अर्ज दाखल केले. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडून हेमंत टकले, किरण पावस्कर आणि आनंद ठाकूर यांनी अर्ज दाखल केले आहेत.
शिवसेनेचा एकच उमेदवार निवडून येण्याची शक्यता असतानाही निलम गो-हे यांच्याबरोबर राहुल नार्वेकर यांनाही उमेदवारी दिली.

एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी २९ मतांची आवश्यकता आहे. त्यानुसार काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे संख्याबळ व अपक्ष आमदारांचा पाठिंबा पाहता आघाडीचे सहा उमेदवार सहज निवडून येतील. भाजपचे विधानसभेतील संख्याबळ ४७ आहे. त्यानुसार भाजपला दुसरी जागाजिंकण्यासाठी ११ मते कमी पडत आहेत. शिवसेनेचे ४५ सदस्य आहेत. त्यानुसार दुस-या जागेसाठी त्यांना १३ मते कमी पडत आहेत. मनसेने भाजपबरोबर जुळवून घेण्याचे संकेत दिले आहेत. त्याभमुळे आता शिवसेनेची कोंडी होणार आहे.