धुळे जिल्ह्यात गारपिटीने हजारावर मेंढ्यांचा मृत्यू

धुळे – जिल्ह्यात शनिवारी (ता. 8) रात्री झालेला वादळी पाऊस व गारपिटीत भदाणे (ता. धुळे) गावाच्या शिवारात थांबलेल्या मेंढपाळांच्या सुमारे एक हजार मेंढ्या मृत्युमुखी पडल्या. त्यामुळे सुमारे पाच लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांच्यासह तहसीलदार दत्ता शेजवळ यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची माहिती घेतली.

मेंढपाळांना भरपाई देण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्याचे आश्‍वासनही दिले. खानदेशातील जळगावसह धुळे व नंदुरबार जिल्ह्यात शनिवारी (ता. 8) सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी व गारपिटीने थैमान घातले. पाचोरा तालुक्‍यात गारपिटीने कुऱ्हाड (ता. पाचोरा) येथील शेतकऱ्याचा मृत्यू झाला. जामनेर तालुक्‍यातील शेतकऱ्याचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला.

रब्बी पिकांसोबत जनावरेही गारपिटीच्या तडाख्यातून वाचली नाहीत. अनेक ठिकाणी शेळ्या-मेंढ्या तसेच पक्ष्यांना प्राणास मुकावे लागले. लोकप्रतिनिधींनी उशिरा का होईना नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यास सुरवात केलेली असली तरी नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नसल्याचे स्पष्ट आहे. शनिवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. तुरळक पावसाच्या सरीसुद्धा कोसळत होत्या. तशात गारांचा वर्षाव सुरू झाला. जळगाव जिल्ह्यात पाचोरा आणि जामनेर तालुक्‍यास वादळी पाऊस आणि गारपिटीने अक्षरशः झोडपून काढले. त्यात फळबागांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. रब्बी पिकेही जमीनदोस्त झाली.