
मुंबई- विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद व आमदारकी धोक्यात आल्याने विनोद तावडे यांनी शिवसेनेवर आगपाखड केल्याचे दिसून येत आहे. विधान परिषदेसाठी उमेदवार देताना शिवसेनेने समन्वय साधायला हवा होता, सेनेने दोन उमेदवार उभे करून घोडे बाजाराला प्रोत्साहन दिले आहे, अशी टीका विनोद तावडे यांनी काल सायंकाळी सेनेवर केली होती. मनसेकडे असलेली ११-१२ मते भाजपला मिळावीत यासाठी आशिष शेलार यांच्यासह तावडे यांनी कृष्णकूंजवर जाऊन राज यांची भेट घेतली होती. मात्र मनसेने मागील वेळी आशिष शेलार यांना निवडून आणण्यासाठी मदत केली होती. आता तुम्हीच आम्हाला यावेळी मदत करून पैरा फेडावा, असे तावडे-शेलार जोडीला राज यांनी सांगितले आहे. त्यामुळे आपली आमदारकीसह विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद गमविण्याची पाळी तावडेंवर येण्याची शक्यता आहे.
