नवी दिल्ली – राष्ट्रीयीकृत बॅकातल्या बुडित किंवा थकलेल्या कर्जाचे प्रमाण फार चिंताजनक असल्याने ही कर्जे वसूल करण्याचा बँकांनी जास्तीत जास्त प्रयत्न करावा असे आवाहन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केले आहे. या कर्जात मोठ्या उद्योगसमूहाचा वाटा मोठा आहे ही गोष्ट चिदंबरम यांनी मुद्दाम नमूद केली. बँकांच्या कर्ज वितरणाचा आणि वसुलीचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीसमोर ते बोलत होते.
मोठ्या उद्योग समूहांना जादा कर्ज वितरण झाले आहे. मध्यम उद्योगांना झालेले कर्ज वाटप मात्र समाधानकारक नाही असे चिदंबरम म्हणाले. कृषि क्षेत्राला झालेले कर्ज वितरण समाधानकारक आहे अशी टिप्पणी त्यांनी केली. अर्थव्यवस्था ताळ्यावर आणायची असेल तर बँकांतली ही थकित आणि बुडित कर्जे वसूल केली पाहिजेत आणि तेच आताचे सर्वात मोठे आव्हान आहे असे चिदंबरम म्हणाले.
एनपीए म्हणजे बुडित आणि थकित कर्जाचे प्रमाण एका वर्षात फार वाढले आहे असे चिदंबरम यांनी आकडेवारीनिशी दाखवून दिले. २०१३ सालच्या केवळ सहा महिन्यात ही कर्जे २८ टक्क्यांनी वाढली असल्याचे त्यांनी दाखवून दिले. ही मोठी चिंताजनक बाब आहे असे ते म्हणाले.
मार्च २०१३ मध्ये ही कर्जे १.८३ लाख कोटी होती ती सप्टेंबर मध्ये २.३६ लाख कोटी रुपये झाली असे चिदंबरम यांनी दाखवून दिले. या काळात बँकांनी एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत केवळ १८ हजार ९३३ कोटी रुपये एवढीच वसुली केली असे ते म्हणाले.