युक्रेनकडूनही युध्दाची तयारी सुरु

कीव्ह – रशियन फौजा क्रीमियामध्ये घुसल्यानंतर युक्रेननेही युध्दाची तयारी सुरु केली आहे. युक्रेनचा भाग असलेल्या क्रीमियावर रशियन फौजांनी ताबा मिळवला आहे. युक्रेनमधील रशियन नागरिकांच्या हितरक्षणासाठी आपल्याला हे पाऊल उचलण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले. रशियाचे समर्थन असलेले युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष विक्टर यानुकोविच यांची गेल्या आठवडयात गच्छंती झाल्यानंतर रशियाने युक्रेनवर नियंत्रण मिळवण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे.

रशियाच्या या युध्दखोरीच्या भूमिकेला अमेरिकेने कडाडून विरोध केला आहे. अमेरिकेने रशियाला आर्थिक कोंडी करण्याची धमकी दिली असून, गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराही दिला आहे. शीतयुध्दानंतर अमेरिका-रशिया पुन्हा एकदा परस्परांसमोर उभे ठाकले आहेत. सध्या आरसीनी यात्सीन्यूक युक्रेनचे हंगामी पंतप्रधान आहेत. त्यांची पाश्चिमात्य देशांना अनुकूल असलेली भूमिका रशियाला अजिबात मान्य नाही. त्यामुळे रशिया थेट युध्दाच्या तयारीत आहे. रशियन फौजांनी रविवारी युक्रेनच्या काही लष्करी छावण्यांभोवती घेराव घालून तिथल्या सैनिकांसमोर निशस्त्रीकरणाचा प्रस्ताव मांडला. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. रशियाने माघार घ्यावी यासाठी अमेरिकेने सध्या राजकीय, कुटनैतिक आणि आर्थिक दबावाच्या रणनितीवर लक्ष केंद्रीत केले आहे.