नागपूर : आगामी काळात होत असलेल्या लोकसभेच्या निवडणूक रिंगणात भाजपचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी व आम आदमी पार्टी (आप)च्या राज्य संयोजिका अंजली दमानिया या आमने- सामने उभे राहिले आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षातील वाद वाढत चालला आहे. गडकरी यांच्या सर्मथकांनी दमानिया यांच्या विरोधात गणेशपेठ पोलिसात तक्रार दाखल करीत कारवाईची मागणी केली. त्यामुळे आता दमानिया विरुद्ध भाजप असे तक्रार युद्ध रंगले आहे.
नागपूर लोकसभेच्या रिंगणात भाजपकडून उतरलेले राष्ट्रीय नेते नितीन गडकरी व आम आदमी पार्टी (आप) च्या राज्य संयोजिका अंजली दमानिया यांनी आतापासूनच एकमेकांविरोधात आघाडी उघडली आहे. दमानिया यांनी गडकरी यांच्याशी संबंधित असलेल्या दोन संस्था पूर्ती पॉवर अँण्ड शुगर लिमिटेड (पीपीएसएल) तसेच शिक्षक सहकारी बँक (एसएसबी) वर कृषी कर्ज माफीच्या रकमेत घोळ केल्याचा आरोप केला आहे.
गडकरी यांच्या सर्मथकांनी दमानिया यांच्या विरोधात गणेशपेठ पोलिसात तक्रार दाखल करीत कारवाईची मागणी केली. काही दिवसांपूर्वीही दमानिया विरुद्ध भाजप असे तक्रार युद्ध रंगले होते.
भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गडकरी शुक्रवारी नागपुरात आले असता त्यांनी आपल्याविरोधात भ्रष्टाचाराचे पुरावे मिळाले तर राजकारणातून संन्यास घेऊ, असे आव्हान दिले होते. यानंतर ‘आप’ चे पदाधिकारी दुपारी १२ च्या सुमारास महालातील गडकरी वाड्यावर पोहचले. त्यांनी गडकरी यांच्याशी संबंधित संस्थांनी कृषी कर्ज कर्ज माफीच्या रकमेत घोळ केल्याबाबतची कागदपत्रे गडकरी यांच्या स्वीय सहायकांकडे सोपविली.
पत्रकार परिषदेत दमानिया यांनी सांगितले की, वर्धा येथील शेतकरी श्यामराव सातपुते यांनी पूर्ती व शिक्षक सहकारी बँकेने कृषी कर्ज माफीच्या रकमेत घोळ केल्याचे पुरावे आपल्याकडे सोपविले आहेत. आपण तेच पुरावे गडकरी यांच्याकडे सुपुर्द केले. सातपुते यांना शेतात उसाची लागवड करण्यासाठी पूर्तीने कर्ज दिले होते. हे कर्ज ऊस विक्रीच्या रकमेतून कपात करायचे होते. पूर्तीने कर्ज व व्याजाची रक्कम कपात केली, मात्र बँकेत ती जमा केली नाही. काही दिवसानंतर शिक्षक सहकारी बँक शेतक-याकडून कर्ज वसुलीच्या कामी लागली. याबाबत पूर्तीच्या अधिका-याना सांगण्यात आले.