मुंबई – ठाणे आणि शेजारच्या नवी मुंबईसाठी समूह विकास योजना (क्लस्टर डेव्लपमेंट) लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी संध्याकाळी विधानसभेत केली. या निर्णयामुळे ठाण्यात धोकादायक इमारतींमध्ये रहाणा-या हजारो रहिवाशांना दिलासा मिळणार आहे.
ठाणे, कळवा, मुंब्रा पट्ट्यात मोठया प्रमाणावर अनधिकृत बांधकामे असून, समूह विकास योजनेच्या माध्यमातून ही बांधकामे नियमित होऊ शकतात. ठाण्यात समूह विकास योजना लागू करावी यासाठी वेगवेगळया राजकीय पक्षांनी आंदोलने केली होती. क्लस्टर योजनेबरोबरच मुंबईतील २००० सालापर्यंतच्या झोपडयांना संरक्षण देणारे विधेयकही विधानसभेत मंजूर झाले आहे.
२००४ साली आघाडी सरकारने निवडणूक जाहीरनाम्यातून २००० साला पर्यंतच्या झोपडयांना संरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. हे विधेयक मंजूर झाल्याने २००० पर्यंतच्या झोपडयांना अधिकृत पाणी-वीज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचा लाखो कुटुंबाना फायदा होणार आहे.