11 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाने पाहिली अशी एंट्री, वयाच्या 22 व्या वर्षी टॉड मर्फीने गाजवले वर्चस्व


भारताविरुद्ध पदार्पण करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा ऑफस्पिनर टॉड मर्फीने नागपूर कसोटीच्या दुसऱ्या दिवशी आश्चर्यकारक कामगिरी केली. मर्फीने पहिल्या डावात 5 विकेट्स घेतल्या आणि यासह त्याने विशेष यादीत स्थान मिळवले.

22 वर्षीय तरुण ऑफस्पिनरने 10 फेब्रुवारी रोजी केएल राहुल, रविचंद्रन अश्विन, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि केएस भरत यांना आपला बळी बनवले. कसोटी पदार्पणात एका डावात 5 बळी घेणारा तो चौथा ऑस्ट्रेलियन ऑफस्पिनर आहे.

सर्वप्रथम, पीटर टेलरने 1986-87 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सिडनी कसोटीत 78 धावांत 6 बळी घेतले होते. अशी कामगिरी करणारा तो पहिला ऑस्ट्रेलियन ऑफस्पिनर ठरला होता.

त्यानंतर 2008 मध्ये भारत दौऱ्यावर आलेल्या जेसन क्रेझानेही नागपूर कसोटीत पदार्पण केले आणि पहिल्या डावात 215 धावांत 8 बळी घेतले.

यानंतर सध्याचा ऑस्ट्रेलियाचा ऑफस्पिनर नॅथन लायननेही हा पराक्रम केला. 2011 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत लायनने 34 धावांत 5 बळी घेतले होते.