वाटेला गेल्यास भगवाच डोक्‍यात हाणू- ठाकरे

कणकवली – उद्योगमंत्री असूनही कोकणात एक तरी उद्योग आला का, याचा जाब सत्ताधाऱ्यांना विचारायला हवा. इथे येताना आम्हाला काहींनी धमक्‍या दिल्या. आम्हाला पाकिस्तानातून रोज शंभर धमक्‍या येतात. त्यामुळे असल्या धमक्‍या देणाऱ्यांना आम्ही जुमानत नाही. धमक्‍या देणाऱ्यांना आम्ही माफ केलंय; पण एकाही शिवसैनिकाच्या वाटेला गेलात तर तोच भगवा डोक्‍यात हाणल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज येथे विरोधकांना दिला.

ठाकरे सक्रिय राजकारणात उतरल्यानंतर पहिल्यांदाच जिल्हा दौऱ्यावर आले. कॉंग्रेसचे युवा नेते नीतेश राणे यांनी त्यांना जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा दिला होता. यामुळे दौऱ्याबाबत उत्सुकता होती. ठाकरे यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत झंझावाती दौरा केला. यात सुमारे दोनशे मोटारींच्या ताफ्यासह मोटारसायकल व शेकडोंच्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते. जिल्ह्याबरोबरच राज्याच्या इतर भागातून कार्यकर्ते आले होते. त्यांचे मळेवाड (ता. सावंतवाडी) येथे दमदार स्वागत झाले. यानंतर वेंगुर्ले, कुडाळ येथे रॅलीसह त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. दुपारी अडीच वाजता श्री. ठाकरे आपल्या ताफ्यासह कणकवलीत आले. शहराच्या वेशीवरील गडनदी ते पटवर्धन चौकपर्यंत शेकडो दुचाकींची रॅली काढण्यात आली होती. शिवसेना सचिव आणि आमदार विनायक राऊत, जिल्हाप्रमुख वैभव नाईक, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, तालुकाप्रमुख सचिन सावंत यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आदित्य ठाकरे म्हणाले, “”देशात, राज्यात भगवी लाट आहे. यापुढे एकच भगवा दिसणार आहे. यात कोकणातील जनतेने मागे राहून चालणार नाही. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेतून शिवसेनेचा उमेदवार मताधिक्‍याने निवडून आणायचा आहे.

कोकणचा काही विकास झालाय, तो युती शासनाच्याच काळात झालाय. त्यानंतरच्या सरकारमधील शिक्षणमंत्री, आरोग्यमंत्री इथे आले का? इथला विकास झाला का? उद्योगमंत्री असूनही कोकणात एक तरी उद्योग आला का, याचा जाब सत्ताधाऱ्यांना विचारायला हवा. आम्हाला महाराष्ट्र लुटणारे नकोत; तर राज्य घडविणारे हात हवे आहेत. त्यासाठीच कोकण दौऱ्यावर आलो आहे.” ते म्हणाले, “”शिवसेनाप्रमुखांनी मराठी माणसांसाठी संघटना उभारली. त्यांचं आणि कोकणचं नातं कौटुंबिक होतं आणि ते यापुढेही राहील. कोकणात मच्छीमार, बागायतदार, शेतकरी आणि सर्वसामान्य अडचणीत आहेत. प्रचंड बेरोजगारी आहे. या असंतोषाविरोधात आंदोलने केली तर ती पोलिसी कारवाईने मोडून काढली जातात. आंदोलने दडपणाऱ्या पोलिसांसासाठी तरी राज्य शासनाने काय केलंय याची माहिती सत्ताधाऱ्यांनी द्यायला हवी.”

श्री. ठाकरे म्हणाले, “”गृहमंत्री आर. आर. पाटील कोकणात येऊन कुणाला सॅल्यूट मारायचा आणि कुणाला बेड्या ठोकायच्या, असा सवाल करतात. त्यांनी कुणाला बेड्या ठोकायच्या आहेत हे जाहीर करायला हवं. देशात आणि राज्यात युतीचीच सत्ता येणार असल्याने त्यात तुमचाही सहभाग हवा. त्यासाठी शिवसेना युतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा.” आमदार विनायक राऊत म्हणाले, “”भगवा हटविण्याची ताकद कुणात राहिलेली नाही. कोकणचा सर्वांगीण विकास युती शासनाच्या काळात झाला. आता पुन्हा युती शासनच विकास घडवून आणणार आहे. तसेच घोटाळेबहाद्दरांना तुरुंगात टाकू.” शहरातील गडनदी ते पटवर्धन चौकापर्यंत मोटार रॅलीत शिवसेना पदाधिकारी गुरुनाथ मिठबावकर, युवा सेना सरचिटणीस पराग कदम, शैलेश परब, जिल्हा युवा सेनाप्रमुख हर्षद गावडे, राजेश खोत यांच्यासह उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये व इतर पदाधिकारी, शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते.