पाकिस्तानात २३ जवानांची हत्या

इस्लामाबाद – पाकिस्तानातल्या तालिबानी अतिरेक्यांनी सोमवारी पाकिस्तानी लष्कराच्या सीमावर्ती भागातील फ्रंटियर कोर या दलातील २३ जवानांची हत्या केली. तालिबानी संघटनांच्या तहेरिके तालिबान पाकिस्तान या गटाने हे कृत्य केले. या प्रकाराची देशात मोठी प्रतिक्रिया उमटली आहे. २०१० सालपासून हे २३ जवान या संघटनेने अपहरण करून ओलीस ठेवले होते. काल त्यांची हत्या केली.

या जवानांच्या हत्या आपणच केले असल्याचे पत्रक या संघटनेने काढले असून आपल्या गटाच्या काही कार्यकर्त्यांना बेकायदारित्या अटक करणे आणि काही नेत्यांच्या हत्या याचा बदला घेण्यासाठी आपण हे कृत्य केले असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानी लष्कराने या घटनेचा निषेध केला असून हे कृत्य जनतेला भडकवणारे असल्याचे म्हटले आहे.

दोनच दिवसांपूर्वी पाकिस्तानातील या गटाने सिंध प्रांताची राजधानी कराची येथे पोलिसांच्या एका वाहनावर हल्ला करून १३ पोलिसांना ठार मारले आहे. त्यापाठोपाठ त्यांनी हे कृत्य केले.