अनेक उत्पादनांसाठी आयएसआय मार्क आवश्यक होणार

नवी दिल्ली -भारतीय मानक ब्युरोने आयएसआय मार्क वापरण्यासाठी असलेले नियम कडक केले आहेत. सध्या ९० विविध प्रकारच्या उत्पादनांसाठी हा मार्क वापरला जात आहे मात्र अनेक उत्पादक कंपन्या ब्युरोचा परवाना न घेताच असे मार्क वापरून ग्राहकांची दिशाभूल करत असल्याचा प्रकार सातत्याने घडतो आहे.

या संदर्भात भारतीय मानक ब्युरोचे अध्यक्ष सुनील सोनी म्हणाले की मानक ब्युरो स्थापन झाल्यापासून आत्तापर्यंत ५० हजार परवाने दिले गेले आहेत. येत्या १ वर्षात ही संख्या १ लाखांवर नेण्याचे ब्युरोचे ध्येय आहे. त्यासाठी आय केअर ही मोहिम राबविली जात आहे. त्याच्या मदतीने ग्राहकाना उत्पादनांच्या गुणवत्तेबाबत जागरूक केले जात आहे. ब्युरोने कोणत्या क्षेत्रातील उत्पादनांसाठी हा मार्क आवश्यक आहे त्याची यादीही तयार केली आहे. ग्रामीण भागात जागरण मोहिमेसाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जात आहे.

आयएसआय मार्कसाठी परवाना न घेताच अनेक उत्पादक हा मार्क वापरतात असे दिसून आले आहे. त्यांच्यावर ब्युरोतर्फे बारीक नजर ठेवली जात आहे असे सांगून सोनी म्हणाले की या वर्षात हा मार्क वापरणार्‍या १ हजार उद्योगांवर कारवाई केली गेली आहे. दरवर्षी साधारण अशी २ ते ३ हजार प्रकरणे उघडकीस येतात. त्यांचा उद्योग परवाना रद्द केला जातो.