वीस वर्षात हॅम्बुर्ग शहर होणार मोटारमुक्त

हॅम्बुर्ग – जर्मनीतील हॅम्बुर्ग हे शहर पुढील वीस वर्षात स्वयंचलित वाहनांपासून मुक्त करण्यासाठी हॅम्बुर्ग पालिका प्रयत्न करणार आहे. स्वत:ची गाडी असावी, त्यातून हवे तिथे फिरायला जाता यावे, असे स्वप्न एकेकाळी भारतातील मध्यमवर्गीय पाहत असत. पण कालांतराने परिस्थिती बदलली आणि हे अनेकांचे हे स्वप्न साकार होऊ लागले. पण परदेशात जवळपास प्रत्येक कुटुंबात किंबहुना प्रत्येकाकडे गाडी असणे ही बाब कधीच जुनी झाली. त्यातून रस्त्यांवर वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि गाडीच्या वाढत्या वापरामुळे कमी झालेले शारीरिक श्रम अशा समस्यांचे गांभीर्य लक्षात येऊ लागले. त्यामुळेच जर्मनीतील हॅम्बुर्ग शहराच्या पालिकेने एक महत्त्वाकांक्षी योजना तयार केली आहे.

हे शहर पुढील वीस वर्षात स्वयंचलित वाहनांपासून मुक्त करण्यासाठी हॅम्बुर्ग पालिका प्रयत्न करणार आहे. शहरामधील सर्व पदपथ आणि सायकल चालवण्यासाठी असलेल्या मार्गिका जोडण्यात येणार आहेत. अशा प्रकारच्या व्यवस्थेमधून एक हरितजाळे तयार होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शहराच्या सीमांना संपूर्ण शहरी भागाशी जोडल्यामुळे अंतर्गत वाहतूक अतिशय सुरळीत होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रत्येक भाग एकमेकांशी जोडलेला असल्यामुळे या भागात फिरण्यासाठी स्वयंचलित वाहनांची गरज उरणार नाही. शहराच्या उत्तरेकडील भागात नवे हरित विभाग तयार करून त्यांना सध्या अस्तित्वात असलेल्या उद्यानांशी, बागबगीच्यांशी जोडण्यात येणार आहे. ही योजना पूर्ण झाल्यावर शहरात निर्माण झालेल्या हरितजाळ्यामुळे हॅम्बुर्गमध्ये १७०० एकरचा म्हणजे शहराच्या क्षेत्रफळाच्या ४० टक्के इतका हरितपट्टा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे हॅम्बुर्गवासीयांना वीकएंडसाठी शहराच्या बाहेर गाड्या घेऊन जाण्याची गरज उरणार नाही.

शहरातील मुख्य मार्गावरून गाडया नेण्यास मनाई करण्यात येणार नसली तरी उपलब्ध केलेल्या सोयीसुविधांमुळे शहरातील नागरिक व पर्यटक पायी चालून आणि सायकलींचा वापर करून शहरात फेरफटका मारतील, अशी अपेक्षा ही योजना तयार करणारे अधिकारी व्यक्त करत आहेत. या फायद्यांबरोबरच शहरात तयार केलेल्या हरितवर्तुळामुळे वाढणारे तापमान नियंत्रणात ठेवता येईल आणि शहरामध्ये निर्माण होणारी पूरस्थिती टाळता येईल, असेही त्यांना वाटत आहे. केवळ अर्ध्या शतकात जर्मनीमधील आकाराने दुस-या क्रमांकाच्या या शहरातील तापमानात नऊ अंश सेल्शियसची वाढ झाल्याचा इशारा पर्यावरणतज्ज्ञांनी दिला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात गिरीभ्रमण(हाइक), जलतरण, जलक्रीडा संकुल, सहलींची ठिकाणे आणि उपाहारगृहे अशा सोयी उपलब्ध करून दिल्यामुळे, हॅम्बुर्गवासीयांना आणि येणा-या पर्यटकांना अधिक आनंद मिळू शकणार आहे.