मुंबई: टोलप्रश्नी मनसेने दोन दिवसांपूर्वी केलेल्या आंदोलनाची शिवसेनेकडून खिल्लीा उडविण्यात आली आहे. अवघे पाच तास केलेल्या या आंदोलनावर शिवसेनेने खरमरीत शब्दात टीका केली आहे. त्यासोबतच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या या आंदोलनावर सडकून हल्ला केला आहे. मुळातच मनसेचे रास्तारोको हा फुसका बार निघाल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी १२ फेब्रुवारीला आंदोलन केले होते. त्यामध्ये त्यांना पाच तासांचा रास्ता रोको केला होता. त्यामुळे शिवसेनेने मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात “नया है वह” असे म्हणत सामनामध्ये शिवसैनिकांचं आंदोलन आणि मनसेचं आंदोलन यातला फरक दाखवण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी बॅण्डविरोधातल्या आंदोलनात शिवसैनिक जेलमध्ये गेले आणि अशा शिवसैनिकांचा अभिमान असल्याचा उल्लेख सामनामध्ये करण्यात आला आहे.
दुसरीकडे मनसेच्या टोलविरोधी आंदोलनात पोलीस हे आंदोलकांची वाट पाहात माशा मारीत उभे होते, पण कोणीच फिरकलं नाही. त्यामुळे पोलिसांची ‘दिवटी’ वाया गेली असं म्हटलं आहे. गेली कित्येक दशकं शिवसेनेनं रस्त्यावरची अनेक आंदोलनं यशस्वी केली आहेत. मात्र मनसेनं केलेल्या या असफल प्रयत्नाबद्दल जनतेनं त्यांना माफ करावं कारण मनसे रस्त्यावरची आंदोलनं करणा-यांमध्ये नवखी असल्याचा टोला सेनेने लगावला आहे.