चीनी अब्जाधीश जॅक मा जपानच्या आश्रयाला?

अलिबाबा या ई कॉमर्स कंपनीचे संस्थापक आणि चीनी अब्जाधीश जॅक मा यांनी चीन सोडून जपान मध्ये आश्रय घेतल्याच्या बातम्या येत आहेत. जपानच्या राजधानी टोक्यो जवळ एका उपनगरात मा यांना त्यांच्या परिवारासह पाहिले गेल्याचे सांगितले जात आहे. एका स्की रिसोर्ट मध्ये मा, त्यांचा परिवार आणि सुरक्षा रक्षक व खासगी शेफ सह मुक्काम ठोकून आहेत असे वृत्त फायनान्शियल टाईम्सने दिले आहे.

२०२० पासून फार कमी वेळा जॅक मा सार्वजनिक कार्यक्रमात दिसले आहेत. चीन सरकारने दोन वर्षे त्यांच्या व्यवसायावर कडक नियम लावले असून व्यावसायिक विस्तारावर प्रतिबंध घातला आहे. मा त्यानंतर अनेकदा इस्रायल आणि अमेरिकेच्या दौऱ्यांवर गेल्याचे सांगितले जाते. यांनी २०१५ मध्ये भारतात पंतप्रधान मोदी यांचीही भेट घेतली होती. ५८ वर्षीय मा यांनी २०२० मध्ये शांघाई येथे एका कार्यक्रमात बोलताना चीनी सरकारी बँकांच्या कारभारावर टीका करणारे भाषण केले होते आणि तेव्हापासून त्यांचे दिवस फिरले असे म्हटले जाते. व्याज नियमात बदल केले गेले पाहिजेत या त्यांच्या वक्तव्याने जिनपिंग सरकार भडकले आणि मा यांच्यावर अनेक प्रतिबंध लागले.

अत्यंत सामान्य परिस्थितीतून वर आलेल्या जॅक मा यांनी अपार मेहनत आणि कष्ट घेऊन अलिबाबाचा विस्तार केला आणि जगातील तीन नंबरचे श्रीमंत होण्यापर्यंत पल्ला गाठला. पण चीन सरकारवर टीका केल्यानंतर त्यांच्या अँट ग्रुप आणि अलिबाबा विरुद्ध तपास मोहिमा राबविल्या गेल्या, त्यांना अँटचा आयपीओ आणण्यापासून रोखले गेले आणि त्यांचावर २.८ अब्ज डॉलर्स दंड ठोठावला गेला. २०१९ मध्येच मा यांनी व्यवसायातून निवृत्तीची घोषणा केली होती.

शी जिनपिंग यांना अध्यक्षपदाची मुदत वाढवून मिळाल्याने चीन मध्ये अनेक उद्योजक भीतीच्या छायेखाली असून चीन मधून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात आहेत असेही म्हटले जात आहे. जॅक मा यांच्या उद्योगात मोठी गुंतवणूक केलेल्या जपानी सोफ्ट बँकेबरोबरचे संबंध पुन्हा मजबूत करण्यासाठी काम करत असल्याचे सांगितले जात आहे.