इंग्लंडला वादळाचा तडाखा

इंग्लंड – इंग्लंडला वादळाने मोठा तडाखा दिला आहे. मुसळधार पावसासह तासाला १०० किलोमीटर वेगाने वाहणा-या वा-यांनी तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. रेल्वे व रस्ते वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झाला आहे. यामुळे ठिकठिकाणी नागरिक अडकून पडले आहेत. या नैसर्गिक आपत्तीमुळे एक लाख तीस हजार घरातील वीज गायब झाली आहे.

अटलांटिक महासागरातून आलेल्या दोन वादळांनी इंग्लंड हवालदिल झाले आहे. विल्टशायर येथे झाडावर अडकलेली विजेची तार काढताना एका व्यक्तीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. मध्य व उत्तर वेल्समधील ५२ हजार, छेशायरमधील १० हजार, पश्चिम मिडलॅँडकडून १३ हजार तर दक्षिण-पश्चिम भागातून १९ हजार जणांना या वादळाचा फटका बसला. लंडन शहर वाचवण्यासाठी गेल्या १० आठवड्यात थेम्स नदीवर अडथळे २९ वेळा बंद केले आहेत. लंडनची थेम्स नदी धोक्याच्या पातळीवर वाहत आहे. वेगवान वा-यामुळे व्हर्जिन रेल्वेने आपली सेवा रद्द केली आहे. रेल्वे स्थानकावरील पत्रे रेल्वेमार्गात पडले आहेत.

इंग्लंडला या नैसर्गिक आपत्तीतून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी सांगितले. इंग्लंडच्या लष्कराने बचाव व मदतीचे काम हाती घेतले आहे, असे लष्करप्रमुख मेजर जनरल पॅट्रिक सॅँडर्स यांनी सांगितले. या नैसर्गिक आपत्तीमुळे इंग्लंडची सुधारणा-या अर्थव्यवस्थेला मोठा धोका उत्पन्न झाला आहे, असे बॅँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर मार्क चर्नी यांनी सांगितले. इंग्लंडच्या दक्षिण वेल्स, स्कॉटलंड पश्चिम, उत्तर आर्यलड आणि दक्षिण इंग्लंडच्या काही भागात शुक्रवारी मुसळधार पाऊस व बर्फ पडण्याची शक्यता आहे, असे हवामान खात्याने सांगितले. वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वेल्स भागात जोरदार वा-यामुळे वीजवाहिन्यांचे मोठे नुकसान झाले आहे, अशी माहिती एनर्जी नेटवर्क्‍स असोसिएशनने दिली.