हातावर नाक उगवून त्याचे चेहेऱ्यावर रोपण यशस्वी

पॅरीस: विज्ञानाने केलेली अफाट प्रगती आणि त्याचा आंतरशाखीय वापर यामुळे मानवी जीवन अधिकाधिक सुलभ होत चालले आहे. नाक गमावलेल्या एका महिलेच्या हातावर नाक उगवून त्याचे चेहेऱ्यावर करण्यात आलेले रोपण हे त्याचे उदाहरण आहे.

एका मध्यमवयीन महिलेला नाकाच्या पोकळीत कर्करोग झाल्याचे निदान झाले. कर्करोगाचा हा अतिशय जटील प्रकार आहे. या कर्करोगामुळे नाकाशी संबंधित बहुतेक सर्व शारीरिक क्रिया ठप्प होतात.

या महिलेला शस्त्रक्रियेनंतर देण्यात आलेल्या रेडिओ थेरेपी आणि किमो थेरेपीमुळे तिला नाक गमावण्याची पाळी आली. ही शस्त्रक्रिया सन २०१३ मध्ये झाली. त्या काळात वैद्यकीय विज्ञान, तंत्रज्ञान पुरेसे विकसित नसल्याने तिला काही वर्ष नाकविना फेस मास्क लावून काढावी लागली.

वैद्यकीय क्षेत्रात अवयव प्रत्यारोपण करण्यासाठी 3 प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाल्यानंतर डॉक्टरांनी या तंत्राचा वापर करून तिच्या हातावर पेशींचे टोपण करून नाक तयार केले. पूर्ण वाढ झाल्यानंतर ते हातावरून काढून चेहेऱ्यावर रोपण करण्यात आले.

या शस्त्रक्रियेनंतर १० दिवस या महिलेला रुग्णालयात ठेवण्यात आले. त्यानंतर काही काळ औषधोपचार घेऊन या महिलेची प्रकृती ठणठणीत झाली. आता ती सामान्य जीवन जगत आहे.