२६/११ शहीदांच्या मुलांसाठी उच्च श्रेणीत नोकर्‍या

मुंबई – मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या मुलांना कलास वन आणि क्लास टू श्रेणीतील नोकर्‍या देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. यापूर्वी अशा प्रकारे अनुकंपा तत्त्वावर दिल्या जाणार्‍या नोकर्‍यात संबंधितांना कलास तीन आणि चार मध्ये नोकरी दिली जात असे. मात्र २६/११ प्रकरणापुरताच हा नियम बदलला गेला आहे असे समजते.

या हल्यात शहीद झालेल्या बाबूराव दुर्गुडे यांची मुलगी पूनम हिला अनुकंपा तत्त्वावर तृतीय श्रेणीत नोकरी दिली गेली होती तेव्हा तिने गृहमंत्री आर.आर. पाटील यांची भेट घेऊन द्वितीय अथवा प्रथम श्रेणीत नोकरी देण्याचा विचार करण्याची विनंती केली होती. ती लक्षात घेऊन गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्री चव्हाण यांची भेट घेतली हेाती .त्यानंतर विचाराअंती ज्यांची या पदांसाठी योग्यता आहे त्यांना प्रथम श्रेणी अथवा द्वितीय श्रेणीत नोकरी देण्याचा निर्णय घेतला गेला असे समजते.

या हल्ल्यातील जिवंत पकडला केलेला अतिरेकी कसाब याला पकडणार्‍या तुकाराम ओंबळे यांची कन्या भारती हिला प्रथम श्रेणी अधिकारी म्हणून यापूर्वीच अनुकंपा तत्त्वावर नोकरी दिली गेली आहे.