सोलापूर – आपण अभिनय करता करता अपघाताने लेखक झालो आणि बघता बघता आपली २७ पुस्तके प्रकाशित झाली आहेत, असे नामवंत अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी सोलापुरात काल बोलताना सांगितले. सोलापूरचा सहकार महर्षि साहित्य पुरस्कार दिलीप प्रभावळकर यांच्यासह चौघांना देण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमात दिलीप प्रभावळकर यांना पत्रापत्री या पुस्तकाबद्दल, विजय केंकरे यांना त्यांची नाटके या आत्मकथनाबद्दल तर संजय मेश्राम यांना सलाम मलाला या त्यांच्या पहिल्याच पुस्तकाबद्दल हे पुरस्कार देण्यात आले. ११ हजार रुपये रोख आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
ज्येष्ठ पत्रकार अरुण टिकेकर यांना या कार्यक्रमात जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सोलापूरच्या संचार दैनिकाचे संपादक धर्मराज काडादी यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. दिलीप प्रभावळकर यांनी आपल्या अभिनयाचा आणि लेखनाचा प्रवास श्रोत्यांसमोर मांडला.