पुणे ता ७ : सायबर गुन्हेगार आणि दहशतवादी शक्तींना आमच्या बॅंकिंग यंत्रणेशी खेळ करू दिला जाणार नाही तसेच या यंत्रणेतील प्रत्येक घटकाच्या विशेषतः ग्राहकाच्या विश्वासाला धक्का बसेल असे कृत्य करण्याचे साहस कोणी करू नये यासाठी कार्यक्षम उपाय केले जातील. रिझर्व्ह बँक याबाबत अतिशय संवेदनशील आहे अशी माहिती कार्यकारी संचालक जी. गोपालकृष्ण यांनी आज येथे इसाका ने आयोजित केलेल्या परिसंवादात दिली.
आधुनिक तंत्र अमलात आणताना ग्राहक विश्वास भक्कम राहील हे विस रता कामा नये असे नमूद करून ते म्हणाले की रिझर्व्ह बँकेने याबाबत अभ्यास करण्यास आणि बँकांना उपाय सुचवण्यास एक कृती गट नेमला होता त्याचा मी अध्यक्ष होतो . या कृती गटाच्या शिफारशी असलेला अहवाल अर्थ मंत्रालय आणि केंद्र सरकारकडे पाठवला आहे अन त्याची तंतोतंत अमलबजावणी करण्याच्या सूचना बँकांना देण्यात आल्या आहेत. सायबर गुन्हेगार कशा प्रकारे यंत्रणेवर हल्ला करतील याचा अंदाज बांधणे अशक्य आहे. मात्र आम्ही ते आव्हान म्हणून स्वीकारले आहे. जगातील दहा मोठ्या धोक्यात सायबर हल्ला गणला जातो. कृती गटाने एकूण २ ५ ६ सूचना केल्या आहेत. बँका तंत्रज्ञानाचा वापर वाढवतात तसेच कामे आउटसोर्स करतात हे लक्षात घेता ग्राहकांना शिक्षण देणे आवश्यक आहे आणि आपण काम ज्यांच्याकडून करून घेतो त्यांची विश्वासार्हता तपासायला हवी.
माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या अनुषंगाने कार्यप्रणालीत कोणते बदल करायला हवेत तसेच संचालकापासून ते कनिष्ठ कर्मचारी वर्गाने कोणती खबरदारी घ्यावी याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत असे स्पष्ट करून ते म्हणाले की कार्यप्रणाली सुरक्षित करण्याची प्रक्रिया वेगात होणे गरजेचे असून त्यावर संचालकांनी लक्ष ठेवायला हवे . अत्यंत महत्वाच्या कामासाठी ISO 27001 प्रणाली वापरणे अनिवार्य आहे. खासगी बँकांच्या तुलनेत सार्वजनिक क्षेत्रातील बँकात सुरक्ष उपायात पुरेशी कार्यक्षमता नाही असे निदर्शनास आले आहे. गैर प्रकाराची शक्यता आणि शोध याबाबत प्रगती झालेली नाही. कायदेशीर बाबतीत येणारी जोखीम आणि गैरप्रकाराने हरवलेला माहितीसाठा परत मिळवण्यात पुरेशी खबरदारी घेतली जात नाही. खबरदारी आणि यंत्रणा सुधारणेस बँकांना खर्च करावा लागेल याची जाणीव रिझर्व्ह बँकेला असून त्याकडे लक्ष दिले जाते आहे.
, लवकरच भारताची अर्थव्यवस्था भरारी घेईल, त्यामध्ये माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राचा मोठा सहभाग असेल आणि आपण अर्थ सुरक्षेकडे प्रवास करू,’ असा विश्वास ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर यांनी व्यक्त केला.
‘इन्फॉर्मेशन सिस्टीम्स ऑडीट अॅन्ड कंट्रोल असोसिएशन’(आयएसएसीए)च्या पुणे चॅप्टरतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘२०१४ आयटीएस एनेब्लिंग द डिजिटल वर्ल्ड’ या माहिती सुरक्षेवरील राष्ट्रीय परिषदेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून केळकर बोलत होते. ‘आयएसएसीए’च्या पुणे चॅप्टरचे अध्यक्ष संदीप गोडबोले, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक डॉ. ए. के. हिरवे यावेळी तसेच भारतीय रिझर्व्ह बँकेचे कार्यकारी संचालक जी. गोपालकृष्णन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे परिषदेला उपस्थित होते.
केळकर म्हणाले, की भारताच्या विकासाची कथा १९९० पर्यंत आणि १९९० नंतर अशी दोन भागामध्ये विभागली आहे. ते म्हणाले, “भारताच्या विकास दरामध्ये दर दशकामध्ये वाढ होत गेली. हा दर १.२९ टक्के, १.३४ टक्के, ३.०७ टक्के, 4.२५ असा वाढत गेला मात्र, १९९० नंतरच्या दशकामध्ये तो एकदम ६.५ टक्के आणि २००८ पर्यंत हा दर ८ टक्क्यांपर्यंत गेला. धोरणांमधील त्रुटी, अनुदानामध्ये मोठ्या प्रमाणावर झालेली वाढ, व्याज दरांमधील वाढ यांमुळे वित्तीय तुट वाढत गेली आणि जगामध्ये आलेल्या आर्थिक मंदीमुळे, २००८ मध्ये विकासाचा हा वेग मंदावला आणि तो ४.५ टक्क्यांवर थांबला आहे.”
ते पुढे म्हणाले, “भारतामध्ये सर्वच क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर मंथन सुरु आहे. पारंपरिक राजकीय पक्ष, प्रशासन यांमध्ये मोठे अमुलाग्र बदल होत आहेत. विकेंद्रीकरण होत आहे. तसेच कुशल आणि उत्तम मनुष्यबळ भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासारख्या उद्योगांमध्ये नवे उद्योजक मोठ्या प्रमाणावर येत आहेत. यांबरोबरच अनुदानामध्ये झालेली कपात आणि धोरणांमध्ये थोडे बदल केल्यास, पुन्हा एकदा भारतीय अर्थव्यवस्था भरारी घेऊ शकेल आणि विकास दर ८ ते ९ टक्क्यांपर्यंत जाऊ शकेल.”
यावेळी प्रास्ताविक करताना ‘आयएसएसीए’च्या पुणे चॅप्टरचे अध्यक्ष संदीप गोडबोले म्हणाले, “सध्या मोबाईलवरून इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढत असून, माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा वेगाने विस्तार होत आहे. हे माहितीच्या विस्फोताचे युग आहे. इंटरनेटवर उपलब्ध असणाऱ्या माहितीपैकी ८० टक्के माहिती ही, गेल्या काही वर्षांमध्ये निर्माण झाली आहे. मात्र त्याबरोबर माहिती-तंत्रज्ञान सुरक्षा, हमी (आयटी अॅश्युरन्स), प्रशासन (आयटी गव्हर्नन्स), माहिती व्यवस्थापन, माहितीचे परीक्षण आणि विश्लेषण, माहितीचे नियंत्रण या सगळ्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आव्हाने निर्माण झाली आहेत.” यासाठी ‘आयएसएसीए’तर्फे संशोधन आणि विविध अभ्यासक्रम तयार करण्यात आल्याचे, गोडबोले यांनी सांगितले.