औरंगाबाद – महावितरणने यापुढील काळात वीज कनेक्शन फक्त ऑनलाइन देण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला आहे. ऑनलाईन प्रणाली अंवलंबिण्यात व कनेक्शन देण्यात उशीर करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित केले जाणार आहे. महावितरणकडून वीज कनेक्शन घेण्यासाठी सतत फेऱ्या माराव्या लागतात. कोटेशन भरून वर्षानुवर्षे झाली तरी कनेक्शन मिळाल्या नसल्याच्या तक्रारी आहेत.
वीज कायदा- २००३ नुसार प्रत्येक कामासाठी निश्चित कालावधी ठरवून दिला आहे. मात्र या कालावधीत कनेक्शन मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. अनेक लोकप्रतिनिधी व ग्राहकांच्या तक्रारी लक्षात घेऊन महावितरणने वीज कनेक्शनसाठी फक्त ऑनलाईन प्रणाली राबविण्याचा निर्णय घेतला आहे. कनेक्शन देताना पारदर्शकता आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा महावितरणने केला आहे. वेळेत कनेक्शन न देणाऱ्या अधिकाऱ्यावर निलंबन किंवा प्रसंगी बडतर्फीची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
महावितरणने नवीन कनेक्शनसाठी १५ फेब्रुवारी २०१३ पासून ऑनलाईन पद्धती अस्तित्वात आणली आहे. मात्र त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे होत नसल्याने ग्राहकांच्या तक्रारी कमी होत नव्हत्या. यापुढे फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करावेत, असे आवाहन ग्राहकांना केले आहे. तांत्रिक अडचणी किंवा इतर कारणामुळे नव्या पद्धतीने अर्ज करणार नाहीत, तेथे स्थानिक अधिकाऱ्यांनी अर्जाची ऑनलाइन प्रक्रियेत नोंदणी करून घ्यावी, असे आदेश महावितरणने अधिकाऱ्यांना दिले आहेत. वीज कनेक्शनसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत जीटीएललाही लागू आहे. जीटीएल महावितरणची फ्रॅन्चाइजी असून कंपनीचे सर्व नियम त्यांना लागू होतात, असे सांगण्यात आले. त्यामुळे जीटीएलकडे अर्ज करण्यासाठीही ऑनलाइन प्रक्रिया करावी लागणार आहे.