पुणे- मुंबई पोलिस आयुक्तपदाचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केलेल्या डॉ. सत्यपाल सिंह यांच्या कारकिर्दीत झालेल्या कामकाजाची तपासणी झाली पाहिजे. त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दोनदा खासदारकी दिली आणि आता राज्यपालपदाची भेट दिली, त्या श्रीनिवास पाटील यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी असताना आणि पिंपरीचे आयुक्त असताना केलेल्या कामकाजाची तपासणी आगामी काळात करण्यात यावी अशी भूमिका पुण्यातील आम आदमी पार्टीचे नेते मारुती भापकर यांनी घेतली आहे.
याबाबत पुढे बोलताना भापकर म्हणाले, ‘काही दिवस अधिकारी म्हणून काम पाहिलेले श्रीनिवास पाटील हे पूर्वीपासून पवार कुटुंबियांचे जवळचे होते हे आता स्पष्ट झाले आहे, त्या अनुषंगाने त्यांनी आपल्या प्रशासकीय सेवेत काही भूखंडांचे वाटप किंवा अन्य काही वादग्रस्त निर्णय घेतले होते. आता त्या निर्णयाची तपासणी करण्याची मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे.’
याशिवाय सत्यपाल सिंह हे देखील उजव्या विचारसरणीचे असल्याचेच स्पष्ट झाले आहे. नागपूर येथे पोलिस आयुक्तपदावर असताना त्यांचा भाजप आणि संघ परिवारासोबत राबता होता. पुढे सिंह यांच्या पुण्यातील कारकिर्दीत तत्कालीन गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनीही सिंह यांच्यावर जाहीर आरोप केले होते.
मुंबई पोलिस दलात आयुक्तपदी काम करीत असताना सिंह पोलिसांना मी ‘खरा जिहाद’ शिकवला आहे, असे म्ह णत होते. मुंबई पोलिस दलातही सिंह यांच्या या वक्तव्याची आजही चर्चा होते. त्यामुळेच उजव्या विचारसरणीला विरोध असणा-या अन्य कोणावर सत्यपाल सिंह यांच्याकडून अन्याय झाला आहे काय? याबाबत चौकशी करण्याची मागणी भापकर यांनी निवेदनादारे केली आहे.