शाहरुख खानला मोठा दिलासा, वडोदरा स्टेशन चेंगराचेंगरी प्रकरणी SC ने कायम ठेवला उच्च न्यायालयाचा निर्णय


नवी दिल्ली : अभिनेता शाहरुख खानला पाच वर्षे जुन्या चेंगराचेंगरीत झालेल्या मृत्यूप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. 2017 मध्ये रईस चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान गुजरातमधील वडोदरा रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत एकाचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते. याबाबत काँग्रेस नेते जितेंद्र सोळंकी यांनी स्थानिक न्यायालयात तक्रार दाखल केली होती.

जितेंद्र सोलंकी यांनी वडोदरा कोर्टात तक्रार दाखल करताना सांगितले की, शाहरुखने चित्रपटाचे नाव असलेला टी-शर्ट आणि इतर प्रमोशनल साहित्य जमावाच्या दिशेने फेकले. त्यामुळे हा अपघात झाला. शाहरुख खानने वडोदरा कोर्टातून बजावलेल्या समन्सला गुजरात हायकोर्टात आव्हान दिले. या वर्षी एप्रिलमध्ये उच्च न्यायालयाने हे प्रकरण रद्द केले.

उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले होते की, अभिनेता अधिकृत परवानगीने त्याच्या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. चेंगराचेंगरीची अनेक कारणे होती. कोणा एका व्यक्तीला जबाबदार धरणे योग्य होणार नाही. स्टेशनवरील रेल्वे कर्मचारी, पोलिस, अगदी जखमी कोणीही त्याच्याविरुद्ध तक्रार केली नाही. तेथे उपस्थित नसलेल्या एका व्यक्तीने ही तक्रार केली आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात जितेंद्र सोलंकी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र न्यायमूर्ती अजय रस्तोगी आणि सीटी रविकुमार यांनी त्यांचे अपील फेटाळून लावले.

काय होतं संपूर्ण प्रकरण?
2017 मध्ये शाहरुख खान त्याच्या रईस चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबईहून दिल्लीला ट्रेनने निघाला होता. वाटेत अनेक स्थानकांवर त्याची ट्रेन थांबली, ज्यामध्ये शाहरुखने चित्रपटाचे प्रमोशन केले. गुजरातमधील वडोदरा येथेही ही ट्रेन थांबली आणि शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी तेथे गर्दी जमली. बघता बघता चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली, त्यात फरीद खान नावाच्या व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला. त्यावेळी त्यात काही जण जखमीही झाले होते. फरीद एका नातेवाईकाला स्टेशनवर सोडण्यासाठी आला होता, मात्र त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांच्या लाठीचार्जमुळे झाली चेंगराचेंगरी
स्टेशनवर आलेल्या हजारो चाहत्यांना शाहरुखला पाहायचे होते. जमाव नियंत्रणाबाहेर जाऊ लागल्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यानंतर चेंगराचेंगरी झाली आणि फरीद खान त्याच्या कचाट्यात पडला. पहिल्या स्टेशनवरच बेशुद्ध फरीद खानला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला, परंतु फरीद खान शुद्धीवर आले नाही. त्यानंतर त्याला तातडीने प्लॅटफॉर्मच्या बाहेर काढून रुग्णालयात पाठवण्यात आले, मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

शाहरुखने व्यक्त केले दुःख
प्रमोशनदरम्यान त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने शाहरुखला खूप दुःख झाले. त्यावेळी तो म्हणाले होता, फरीद खान यांच्या निधनाने मला खूप दुःख झाले आहे. मी वडोदरात उपस्थित असलेले क्रिकेटपटू इरफान पठाण आणि त्याचा भाऊ युसूफ पठाण यांना फरीद खानच्या कुटुंबाला शक्य ती सर्व मदत करण्यास सांगितले आहे.