अहमदनगर- श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगाव शिवारातील एका बोअरवेलमध्ये अडकलेल्या चिमुरड्याला सुखरूपणे बाहेर काढण्यात स्थानिक प्रशासनाला यश आले आहे. विलास निकम या ऊस तोडणी कामगाराचा १८ महिन्यांचा चिमुकला शेजारीच शेतात असलेल्या एका बोअरवेल मध्ये पडला होता. त्याला शुक्रवारी रात्री उशीरा सुखरूपपणे बाहेर काढण्यारत प्रशासनाला यश आले आहे.
खैरी निमगाव येथील पटारे यांच्या वस्तीवर ऊस तोडणी कामगार काम करत होते. यावेळी विलास निकम या ऊस तोडणी कामगाराचा १८ महिन्यांचा चिमुकला शेजारीच शेतात असलेल्या एका बोअरवेल मध्ये पडला होता. या मुलाचा तीन वर्षाचा भाऊ बरोबर खेळत होता. त्यानं आपला भाऊ खड्यात पडल्याचे पाहून आईवडिलांना सांगितले. यानंतर तातडीने या ठिकाणी मदत कार्य सुरु झाले.
दिडशे फुट खोल असलेल्या या बोअर वेल मध्ये हा मुलगा तीस फुटांवर अडकला होता. गावकरी आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने या ठिकाणी मदकार्य सुरु केले. मुलाला ऑक्सिजनचा पुरवठाही करण्यात आला. तीन डोझरच्या सहाय्याने मुलाची सुटका करण्याचे प्रयत्न सुरू होते, अखेर रात्री उशीरा या चिमुकल्याला सुखरुप बाहेर काढण्यात यश आले. सध्या त्याला प्राथमिक उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.