मुंबई- आगामी काळात होत असलेल्या निवडणूकीची तयारी सर्वच पक्षांकडून केली हात आहे. त्यामुळे आता भाजपने दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडून हिसकावून घेण्याची रणनीती रचली असल्याळचे समजते. या मतदारसंघातून भाजपच्या आमदार मंगलप्रभात लोढा यांचे सुपुत्र अभिनंद लोढा निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. हा मतदारसंघ भाजपला मिळावा, यासाठी थेट दिल्लीहून प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे आता आगामी काळात शिवसेना हा हक्काचा मतदासंघ सोडणार का याकडे लक्ष लागले आहे.
यामुळे आता आगामी काळात शिवसेनेला या मतदारसंघावर पाणी सोडावे लागणार, अशी स्थिती निर्माण झाली आहे. तसे झाल्यास या मतदारसंघात जोरदार तयारीला लागलेल्या शिवसेनेचे अरविंद सावंत यांचा पत्ता मात्र कट होणार आहे.दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघांवर भाजपचा सुरुवातीपासूनच डोळा होता. हा मतदारसंघ मिळावा, अशी मागणी गेल्या निवडणुकीत भाजपने केली होती. मात्र त्यात भाजपला यश आले नाही. त्या वेळी शिवसेनेचे उमेदवार मोहन रावले चक्क तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. त्यामुळे या वेळी हा मतदारसंघ भाजपला मिळाला पाहिजे, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून आमदार मंगलप्रभात लोढा यांनी सुपुत्र अभिनंदन याच्यासाठी या मतदारसंघातून तयारी सुरू केली आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश येतानाही दिसत आहे. दिल्लीवरून त्यांना तसा शब्द दिल्याचेही भाजपच्या माहीतगारांनी सांगितले. त्याचबरोबर लोढा यांनी नुकतेच मतदारसंघात लता मंगेशकर आणि मोदींना एकत्र आणून शक्तिप्रदर्शन केले होते. हाही याच रणनीतीचा भाग होता. याची कल्पना शिवसेनेला असल्याने शिवसेनेच्या नेत्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती.
दरम्यान, काँग्रसेचे विद्यमान खासदार मिलिंद देवरा यांना शिवसेनेचे अरविंद सावंत टक्कर देऊ शकणार नाहीत, असा युक्तिवाद लोढा यांनी केला आहे. हा मतदारसंघ हातातून जाणार, याची कल्पना शिवसेना नेतृत्वाला आल्याने अभिनंदन यांनी शिवसेनेत प्रवेश करावा आणि शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी, असे प्रयत्न सुरू असल्याचे समजते.