अरबस्तानात भारतीयाला शिरच्छेदाची शिक्षा

रियाध – मूळ भारतीय असलेल्या एका मजुराला खुनाच्या आरोपावरून दोषी ठरवून सौदी अरबस्तानच्या रियाध शहरात शिरच्छेदाची शिक्षा देण्यात आली. तलवारीने त्याचे मुंडके उडविण्यात आले. शिक्षा झालेल्या मजुराचे नाव महमद लतीफ असे असून त्याने नोकरी लावणार्‍या मालकालाच मरेपर्यंत मारले म्हणून त्याच्यावर खुनाचा खटला दाखल करण्यात आला होता.

त्याने मारलेल्या मालकाचे नाव धाफर महंमद अल दुसारी असे होते. लतीफने त्याला आधी मारले आणि तीक्ष्ण शस्त्राने त्याला भोसकून त्याचा मृतदेह एका विहिरीत टाकला. त्याच्यावरचा हा आरोप सिद्ध झाल्यामुळे त्याला ही मध्ययुगीन पद्धतीची शिक्षा देण्यात आली.

मध्यपूर्वेतील अरबी देशामध्ये नोकरी करणार्‍या भारतीय मजुरांना नोकर्‍या मिळवून देण्यासाठी काही दलाल काम करतात आणि या एजन्सीला कफाला असे नाव आहे. या व्यवहारात अनेकदा वाद झालेले आहेत. त्यातलाच हा एक वाद होता. महमद लतीफ हा २०१४ या वर्षात अशी शिरच्छेदाची शिक्षा झालेला तिसरा आरोपी आहे. २०१३ मध्ये या देशात ७८ जणांना मुंडके छाटण्याची शिक्षा झालेली आहे.

बलात्कार, खून, सशस्त्र दरोडा, मादक द्रव्यांचा व्यापार, व्यभिचार आणि धर्मद्रोह अशा आरोपांबद्दल या देशात शिरच्छेदाच्या शिक्षा दिल्या जातात. या देशातल्या शिक्षा अतीशय निर्दयी पद्धतीने राबविल्या जात असतात.