मुंबईचे पोलीस आयुक्त भाजपात

मुंबई – मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला असून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. अशा रितीने राजीनामा देणारे श्री. सत्यपाल सिंग हे पहिलेच पोलीस आयुक्त आहेत. ते भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून उत्तर प्रदेशातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. कदाचित ते मुंबईतून सुद्धा निवडणूक लढवतील.

श्री. सत्यपाल सिंग यांनी काल गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्याकडे आपला राजीनामा पाठवून दिला. त्यांनी आपले भविष्यकाळातील नियोजन उघडपणे सांगितले नाही, पण त्यांच्या आजवरच्या वाटचालीवरून आणि ते स्वच्छ अधिकारी असल्यामुळे भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतील अशी शक्यता वाटत आहे. त्यांनी भाजपाचे अध्यक्ष राजनाथसिंग आणि माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांच्याशी या संबंधात चर्चा केली आहे.

अन्य एका बातमीनुसार आम आदमी पार्टीने सत्यपाल सिंग यांच्याशी संपर्क साधला असून त्यांनी आपल्या पक्षात सामील व्हावे असे त्यांना आवाहन केले आहे. श्री. सत्यपाल सिंग हे २०१५ साली सेवेतून निवृत्त होणार होते. पण त्यांनी त्याच्या आतच नोकरी सोडली आहे. गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी सत्यपाल सिंग यांचा राजीनामा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पाठवला आहे.