थकबाकीदारात ठाकरेंचे नाव आल्याने शिवसेना नेते संतापले

मुंबई- मुंबई महापलिकेने प्रसिद़ध केलेल्या पाण्याच्या थकबाकीदारांमध्ये दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा समावेश झाल्यामुळे शिवसेनेचे नेते चांगलेच संतापले आहेत. या थकबाकीदारांमध्ये ठाकरे कुंटूब राहत असलेल्या मातोश्रीचे नाव आलेच कसे, असा त्रागा करत स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी मातोश्रीचे नाव आल्यामुळे थकबाकीदारांच्या यादीची चौकशी करण्यात येईल, असे जाहीर केले आहे.

या पाण्याच्या थकबाकीवरून वाद सुरू असतानाच सपाचे मुंबई अध्यक्ष अबू असिम आझमी यांनीही आपण पाण्याचे बिल भरले असल्याचे स्पष्ट केले. बिल भरल्याचे आढळून आल्यानंतर महापालिकेला कायदेशीर नोटिस बजावून अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी ६ डिसेंबर २०१३ रोजी महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना पत्र पाठवून पाणीपट्टी थकबाकीदारांची यादी पालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले होते.

वडाळा येथील सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश गुप्ता यांनी माहिती अधिकारात पाणीपट्टीच्या थकबाकीदारांची माहिती मागितली. महापालिकेच्या एफ-उत्तर विभागाने ती न दिल्यामुळे त्यांनी राज्य माहिती आयोगापुढे दाद मागितली होती. महापालिकेची पाणीपट्टी थकबाकी एक हजार कोटी रुपयांच्या आसपास असून थकबाकीदारांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन महापौर सुनील प्रभू यांनी दिले आहे. त्यामुळे आगामी काळात त्यांच्यावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.