लंडनमध्ये भारतीय महिलेला अटक : कुंतल पटेल

लंडन – ब्रिटनमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी कारवाईचा एक भाग म्हणून एका भारतीय महिलेला गेल्या रविवारपासून अटकेत टाकण्यात आले असल्याचे वृत्त आहे. तिचे नाव कुंतल पटेल असे असून ती बारक्लेस बँक या बँकेत नोकरी करत असल्याचे समजते.

लंडनमधल्या दहशतवादविरोधी पोलीस दलाने तिच्या घरावर छापा टाकला आणि घरात काही आक्षेपार्ह कागदपत्रे आणि सामुग्री सापडल्यामुळे तिला अटक केली. कुंतल पटेल ही मूळ भारतीय असली तरी लंडनमध्ये स्थायिक झालेली आहे आणि तिची आई मीना पटेल ही लंडनच्या थेम्स मॅजिस्ट्रेट कोर्टात न्यायाधीश आहे.

३६ वर्षीय कुंतल पटेल ही लंडनमधील प्रतिष्ठीत सामाजिक कार्यकर्ती समजली जाते. तिची लहान बहीण पुनम ही औषध विक्रेती म्हणून कार्यरत आहे. तिच्यासोबत परराष्ट्र कचेरीतील अधिकारी निकोलस सटक्लिफ यांच्या मुलालाही अटक करण्यात आली होती, परंतु त्याला सोडून देण्यात आले. कुंतल पटेल मात्र २६ जानेवारीपासून पोलिसांच्या ताब्यात आहे.