पुणे : चिट फंडाच्या माध्यमातून पैसे गोळा करून नंतर पोबारा करण्याचे प्रकार महाराष्ट्रासह अनेक राज्यात वाढत असल्याने त्याला आळा घालण्यास तसेच स्थानिक, राज्य आणि केंद्राच्या पातळीवर समस्या मांडता याव्या यासाठी महाराष्ट्र स्तरावर चिट फंड व्यावसायिकांची संघटना स्थापन करण्यात आल्याची माहिती निमंत्रक सी लक्ष्मी नारायणन यांनी आज येथे दिली.
या संघटनेचे मुख्यालय पुण्यात सुरु झाले आहे आणि सध्या ४ ५ कंपन्या त्याच्या सदस्य आहेत. सध्या महाराष्ट्रात चिट फंडाच्या माध्यमातून व्यवसाय करणारे ४ ० ० व्यावसायिक आहेत . त्यांना केवळ पाच टक्के नफा फरकावर व्यवसाय करावा लागतो. हे प्रमाण सात टक्के असावे अशी त्यांची मागणी आहे. केंद्र सरकारच्या चिट फंड कायद्याच्या अखत्यारीत या कंपन्या येतात. एम डी श्रीनिवासन आणि रघु बालन यांची संघटनेच्या अध्यक्ष आणि सचिवपदी निवड झाली आहे.
संघटना स्थापन झाल्याने केंद्राची आर्थिक सर्वसामावेशकतेची योजना चांगल्या प्रकारे राबवता येईल असे संघटनेचे मत आहे. तमिळनाडू , आंध्र प्रदेश , कर्नाटक आणि केरळ राज्यात अहि संघटना असल्याने त्या धर्तीवर महाराष्ट्रात संघटना स्थापन झाली आहे. चिट फंड कायद्यात योग्य दुरुस्ती करावी अशी मागणीही करण्यात आल्याचे लक्ष्मी नारायणन यांनी सांगितले.
राज्यात ४ ० ० बेकायदा चिट फंड कार्यरत आहेत. त्यांच्यामुळे इतर व्यावसायिक अडचणीत येतात आणि ठेवीदार आणि कर्जदार दोघांचे नुकसान होते. संघटना स्थापन झाल्याने गैरप्रकारांना आळा बसेल अशी अपेक्षा आहे.