रत्नागिरी- कोकणातील आंबा-काजू या निर्यातक्षम फळांसाठी मंडळ स्थापन करण्याेत येणार असल्यािची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. या मंडळासाठी १०० कोटी रुपये अनुदान देण्यात येणार असल्यााचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. फळपिकांसाठी स्थापन झालेले हे पहिलेच बोर्ड असून कोकणातील फळबागायतदार शेतक-यांसाठी हा ऐतिहासिक निर्णय ठरणार आहे.
दापोली येथील कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. या वेळी राज्यपाल के. शंकरनारायणन आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यासह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते. निसर्गाचे वरदान लाभलेल्या कोकणामध्ये आंबा-काजूचे मोठे उत्पादन होते. मात्र त्यासाठी योग्य नियोजन आणि प्रशिक्षण नसल्यामुळे हे पीक अनेकदा पुरेशा प्रमाणात शेतक-यांच्या पदरात पडत नाही.
उत्पादन नीट आले तर त्यावरील प्रक्रिया उद्योग अथवा त्याबाबतचे प्रशिक्षण नाही, या परिस्थितीकडे लक्ष वेधत, देशाला परकीय चलन मिळवून देणा-या या महत्त्वाच्या फळपिकांसाठी स्वतंत्र मंडळ असावे असा पाठपुरावा राणे यांनी चालवला होता. गेल्या वर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशन काळातही त्यांनी आंबा उत्पादक शेतक-यांसह मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन त्यांचे प्रश्न मांडले होते. मुख्यमंत्र्यांसह उपस्थित अन्य मंत्र्यांनीही राणे यांनी केलेल्या पाठपुराव्याचा यावेळी खास उल्लेख केला.