दिल्ली – भारतातील पर्यटनाला चालना मिळावी, ज्येष्ठ परदेशी नागरिकांना भारत भेटीवर सहज येता यावे यासाठी आणखी ४० देशांना व्हीसा ऑन अरायव्हल देण्याचा विचार सुरू असून गृहमंत्रालयाकडे प्रलंबित असलेल्या या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची त्यासाठी प्रतीक्षा केली जात आहे. या संदर्भातली महत्त्वपूर्ण बैठक ५ फेब्रुवारीला होत असून त्यात अंतिम निर्णय घेतला जाईल असे समजते.
मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या बैठकीत व्हीसा ऑन अरायव्हलची सुविधा अधिक देशांपर्यंत वाढविण्याविषयी चर्चा झाली असून परराष्ट्र धोरण, पर्यटन, पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळ या विभागांनी या अगोदरच या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. नियोजन मंत्री राजीव शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार गृहमंत्रालयाच्या परवानगीची प्रतीक्षा केली जात आहे.
या धोरणानुसार कॅनडा, यूएस, यूके,जर्मनी, कॅनडा, ब्राझील, यूएई, सौदी, फ्रान्स, इटली,स्वीडन, नेदरलँडस,स्वित्झरर्लंड स्पेन, बेल्जियम, ऑस्ट्रीया, डेन्मार्क, पोलंड, नॉर्वे, आयर्लंड या देशाच्या नागरिकांना ही सुविधा मिळू शकणार आहे.