भारतीयांना परदेशी विमान कंपन्यांकडूनही भाड्यात सवलती

येत्या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत व्यवसाय वाढ नोंदविण्यासाठी गल्फच्या एमिरेटस आणि मलेशियाच्या एअर एशिया या विमान कंपन्यांनी भारतीय प्रवाशांसाठी आकर्षक सवलत योजना जाहीर केल्या आहेत. एअर इंडिया, गो एअर, स्पाईस जेट, इंडिगो या स्थानिक विमान कंपन्यांनी प्रवाशांसाठी जाहीर केलेल्या ५० टक्के ऑफ सवलत योजनांना मिळालेल्या उत्तम प्रतिसाद पाहून परदेशी कंपन्यांनीही हाच मार्ग चोखाळला असल्याचे दिसून येत आहे.

गल्फ कॅरिअर्सच्या एमिरेटसने भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सवलती जाहीर केल्या आहेत. भारतातून युरोप, दक्षिण अमेरिका, आफ्रिका येथे जाऊ इच्छिणार्‍या प्रवाशांना इकॉनॉमी आणि बिझिनेस क्लाससाठी कंपनीने सवलती देऊ केल्या असून अनुक्रमे ४१८६७ व १लाख १४ हजारांपुढच्या तिकीटांसाठी त्या लागू आहेत. एप्रिलच्या १० तारखेपर्यत त्यांची मुदत आहे.

मलेशियाच्या एअर एशियाने व्हॅलेंटाईन डे निमित्ताने सवलती जाहीर केल्या आहेत. त्यात कोची, तिरूचरापल्ली येथून क्वालालंपूर पर्यंत अवघ्या चार हजार रूपयांत जाता येणार आहे.चेन्नई बंगलोर येथून हाच प्रवास सर्व करांसह ६५०० रूपयांमध्ये करता येणार आहे. २ फेब्रुवारीपासून ही तिकीटे उपलब्ध असून त्यांची मुदत ३१ जुलै पर्यंत आहे.