अमेरिकेकडून केली जातेय इंडस्ट्रीयल हेरगिरीही – स्नोडेन

केवळ परदेशी नेते, राष्ट्रे यांच्यावरच नव्हे तर अमेरिकेची राष्ट्रीय संरक्षण संस्था परदेशातील उद्योगांवरही बारीक नजर ठेवून असल्याचा धक्कादायक खुलासा एडवर्ड स्नोडेन याने केला आहे. जर्मनीतील पब्लिक टिव्ही ब्रॉडकास्टर एआरडी या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्नोडेनने हे गुपित उघड केले आहे. त्याच्या मते जर्मन इंजिनिअरिंग कंपनी सिमेन्सची अमेरिकेला फायद्याची असलेली माहिती राष्ट्रीय संरक्षण संस्थेकडून सर्रास वापरली जात आहे. ही माहिती राष्ट्रीय महत्त्वाची नाही तरीही हेरगिरी करून ती मिळविली जात आहे आणि वापरलीही जात आहे.

स्नोडेनने यावेळी पत्रकारांसमोर अधिक खुलासा करणार नाही असे सांगतानाच आता त्याच्याकडे एनएसए मधून लंपास केलेले कोणतेही कागदपत्र नाहीत असेही सांगितले आहे. तो म्हणतो ही कागदपत्रे त्याने अगोदरच कांही निवडक पत्रकारांकडे सुपूर्द केली आहेत. अमेरिकन सरकारी प्रतिनिधी त्याला ठार मारण्याच्या प्रयत्नात आहेत असेही त्याने सांगितले. हयुबेल सिपेल या पत्रकराने स्नोडेनची ही मुलाखत डिसेंबरच्या अखेरी मास्कोमध्येच घेतली होती.