वीजदर कमी न केल्यास आत्मदहन : निरूपम

मुंबई : मुंबईतले विजेचे दर कमी करावेत या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेले कॉंग्रेसचे खासदार संजय निरुपम यांनी अनिल अंबानीच्या कंपनीने विजेचे दर कमी न केल्यास आपण आत्मदहन करू असा इशारा दिला आहे. आपण हे आत्मदहन अंबानीच्या घरासमोर करू असे खासदार संजय निरुपम यांनी जाहीर केले आहे.

पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा निर्धार व्यक्त केला. कॉंग्रेस पक्षाचे सरचिटणीस असलेल्या खासदार संजय निरुपम यांनी रिलायन्स वीज कंपनीच्या कांदिवली भागातील विभागीय कार्यालयासमोर आपले आमरण उपोषण सुरू केले आहे.

महाराष्ट्र सरकारने विजेचे दर कमी केलेले आहेत परंतु मुंबईत मात्र ते कमी केले जात नाहीत. म्हणून संजय निरुपम यांनी निषेधाची चळवळ सुरू केली आहे. त्यांच्या सोबत धरणे धरण्यासाठी मुंबईतल्या दुसर्‍या कॉंग्रेसच्या खासदार याही बसल्या आहेत.