इस्लामाबाद- एकांगी बातम्या देऊन तालिबान्यांविरोधात खोटा प्रसार चालविल्याबद्दल तसेच इस्लामविरोधात जाऊन धर्मनिरपेक्षतेचा अवलंब करण्यासाठी प्रसारमाध्यमातून केल्या जात असलेल्या प्रचाराविरोधात पाकच्या तेहरीक ए तालिबान संघटनेने विरोधाचे हत्यार उपसले असल्याचे वृत्त आहे. या संघटनेने २९ पानी फतवाच जारी केला असून त्यात सुमारे २५ पत्रकार, प्रकाशकांना ठार मारले जाणार असल्याची घोषणा केली आहे.
या फतव्यात असे म्हटले गेले आहे की अनेक प्रसारमाध्यमे इस्लामवर अविश्वास दाखवित आहेत. अनेक पत्रकार, प्रकाशक तसेच दूरदर्शन वाहिन्यांचे प्रमुख, कांही अँकर आणि इंग्रजी वर्तमानपत्रांचे संपादक तालिबान विरोधात खोट्या बातम्या सातत्याने देऊन जनतेची दिशाभूल करत आहेत. तसेच इस्लामविरोधात प्रचार करून धर्मनिरपेक्षतेचा आग्रह धरत आहेत ही मुस्लीमविरेाधातील वर्तणूक आहे. या फितुरांचे वर्गीकरण तालिबान्यांनी मुर्जीफ, मुकतील आणि साईबिल फसद असे केले आहे.
संघटनेचा प्रमुख हक्कानी याने असा दावा केला आहे की, प्रसारमाध्यमांनी निःपक्षपातीपणे बातम्या द्यायला हव्यात आणि दोन्ही बाजू समाजासमोर आणायला हव्यात. त्याऐवजी ही माध्यमे एकतर्फी बातम्या देत आहेत आणि आमची बदनामी करत आहेत त्यामुळे त्याला संबंधित असलेल्या लोकांचा समाचार आम्ही घेणार आहोत. आम्ही लष्करी इमारतीतही घुसू शकतो तर प्रसारमाध्यमांच्या इमारतींची काय कथा असाही सवाल त्याने केला आहे.