दिल्लीत सुरू झाली देशातील पहिली व्हर्च्युअल शाळा, केजरीवाल म्हणाले- JEE-NEET साठी तयार होतील विद्यार्थी


नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन शिक्षणाबाबत मोठी घोषणा केली आहे. केजरीवाल यांनी शाळेच्या आवारात वर्गांना उपस्थित राहू शकत नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी दिल्लीत देशातील पहिली आभासी शाळा सुरू केली. यादरम्यान केजरीवाल म्हणाले की, ‘दिल्ली मॉडेल व्हर्च्युअल स्कूल’मध्ये बुधवारपासून प्रवेश सुरू होणार असून, देशभरातील विद्यार्थी अर्ज करू शकतात. केजरीवाल म्हणाले की, ‘व्हर्च्युअल स्कूल’मध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षणही दिले जाईल. शैक्षणिक क्षेत्रात हा मैलाचा दगड ठरणार आहे.

पत्रकार परिषदेत केजरीवाल म्हणाले, देशभरातील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे आणि त्यात NEET, CUET आणि JEE परीक्षांची तयारी तसेच इतर कौशल्य-आधारित प्रशिक्षणाचा समावेश असेल. देशातील पहिली ‘व्हर्च्युअल स्कूल’ ही शैक्षणिक क्षेत्रात मैलाचा दगड ठरेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. ते म्हणाले, अशी अनेक मुले आहेत, जी शाळा दूर असल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे शाळेत जाऊ शकत नाहीत.

अनेक पालक आपल्या मुलींना बाहेर पाठवू इच्छित नसल्यामुळे त्यांना शिक्षण देत नाहीत. अशा मुलांना शिक्षण मिळावे, यासाठी आम्ही ही आभासी शाळा सुरू करत आहोत. ही शाळा कोविड-19 मुळे अत्यावश्यक बनलेल्या ऑनलाइन वर्गांनी प्रेरित आहे. केजरीवाल म्हणाले की वर्ग ऑनलाइन असतील आणि रेकॉर्ड केलेले व्याख्यान देखील ऑनलाइन शेअर केले जातील.