इस्लामाबाद – पाकिस्तानच्या वायव्य भागातील सीमावर्ती क्षेत्रातल्या लष्करी तळावर तालीबान अतिरेक्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटात २० जवान ठार झाले. तालीबान अतिरेक्यांनी अलीकडच्या काळात केलेला हा लष्करावरचा सर्वात घातक हल्ला समजला जात आहे. हा हल्ला लष्कराच्या तळाजवळील बन्नू या शहराजवळ लष्कराच्या वाहनांच्या ताफ्यावर करण्यात आला. त्यात ३० जवान जखमीही झाले.
हा काफिला बन्नू शहराकडून नॉर्थ वजिरीस्थान या आदिवासी भागाकडे चाललेला होता. त्याच्यावर हल्ला झाला, परंतु तो नेमका कसा करण्यात आला हे अद्याप कळलेले नाही. कदाचित मानवी बॉम्बने हा हल्ला केला असावा असा कयास आहे. तालीबान संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि त्यात त्या संबंधीच्या संदेशात हा हल्ला मानवी बॉम्बने केला असल्याचे म्हटले आहे.
तालीबान संघटनेच्या या गटाचा नेता वलिऊर रेहमान याची अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यामध्ये हत्या झाली आहे. तिचा बदला घेण्यासाठी लष्करावर हा हल्ला करण्यात आला असल्याचे या संदेशात म्हटले आहे. अशा प्रकारचे हल्ले करण्याची आपल्याला आवश्यकता वाटत नाही. आपल्या संघटनेच्या समस्या चर्चेने सोडवता येतात, परंतु सरकार चर्चेस तयार नाही म्हणून अशी कृत्ये करावी लागतात, असे या संदेशात म्हटले आहे.