मुंबई – विद्यार्थ्यांसह सर्व स्तरावरून प्रा. डॉ. नीरज हातेकरांना मिळणारा पाठिंबा लक्षात घेता मुंबई विद्यापीठाने त्यांचे निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कौन्सिलची काल रात्री ९ तास मॅरेथॉन बैठक झाली. त्यानंतर मध्यरात्री ३ वाजता विद्यापीठाने प्रसिद्धीपत्रक काढून हातेकरांचे निलंबन मागे घेण्याची शिफारस मंजूर झाल्याचे जाहीर केले. हा विद्यार्थ्यांचा विजय असल्याचे प्रा. हातेकर यांनी सांगितले.
प्राध्यापकांनी एकमेकांच्या पाठीशी उभे राहायला हवे. तुम्ही चांगल्या गोष्टींसाठी लढत असाल तर समाज तुमच्या पाठीशी उभा राहिलच याची खात्री या प्रकरणाने पटली, असेही डॉ. हातेकर पुढे म्हणाले. डॉ. नीरज हातेकर यांची विभागीय चौकशी त्वरित सुरू करण्याचा निर्णयही घेण्यात आला. नैसर्गिक न्याय देण्यासाठी हातेकरांची बाजू समजून घेऊन मग कारवाईची दिशा ठरवली जाईल. हातेकर यांनी उपस्थित केलेल्या १६ मुद्द्यांची चौकशी केली जाणार आहे. या मुद्द्यांमध्ये काहीही तथ्य नाही, पण विद्यार्थी आणि विद्यापीठाचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे.
माजी न्यायाधीश डी. जी. देशपांडे यांची चौकशी समिती नेमून संपूर्ण चौकशी केली जाणार आहे. राज्यपालांच्या आदेशानंतर कुलगुरूंना शहाणपण सुचले असे म्हणावे लागते. विद्यापीठाचा हा निर्णय म्हणजे विद्यार्थी आणि डॉ. हातेकरांचा विजय असल्याचे मानले जात आहे. हातेकरांनी उपस्थित केलेल्या १६ मुद्द्यांची चौकशी करावी या मागणीसाठी हे उपोषण करण्यात येणार आहे. यासाठी स्टुडंट जॉइंट ऍक्शन फ्रंट नावाने विद्यार्थी एकत्र आले आहेत.