धर्मगुरू अंत्यदर्शनासाठी आलेल्या भाविकांत चेंगराचेंगरी- १८ ठार

मुंबई – बोहरी समाजाचे धर्मगुरू सैय्यदना मोहम्मद बुरहानुद्दीन यांच्या अंत्यदर्शनासाठी आलेल्या भाविकांत आज पहाटे तीनच्या सुमारास अचानक झालेल्या चेंगराचेंगरीत किमान १८ जण ठार तर चाळीसहून अधिक भाविक जखमी झाले असल्याचे वृत्त आहे. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

समजलेल्या माहितीनुसार सैय्यदना यांचे वयाच्या १०२ व्या वर्षी शुक्रवारी निधन झाले. त्यांचा पार्थिव देह भाविकांच्या दर्शनासाठी त्यांच्या मलबार हिल येथल्या सैफी महल या निवासस्थानी ठेवण्यात आला होता. आज सकाळी त्यांच्यावर भेंडीबाजार येथील अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. सैय्यदना यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी प्रचंड संख्येने भाविक आले होते. रात्री उशीरापर्यंत ही वर्दळ सुरूच होती. मात्र अचानक पहाटेच्या सुमारास भाविकांची एकच गर्दी उसळली आणि त्यात चेंगराचेंगरी होऊन १८ जणांचा मृत्यू झाला. ४० हून अधिक लोक जखमी झाले. त्यांच्यावर कुलाबा हिल रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

सैय्यदना यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येणार याची कल्पना असल्याने पोलिस बंदोबस्त ठेवला गेला होता. मात्र तरीही हा प्रकार घडला असल्याचे समजते.